ऑनलाईन टीम / अयोध्या :
आज संकटाच्या चक्रव्यूहातून राम जन्मभूमी मुक्त झाली आहे. राम मंदिरासाठी अनेक पिढ्यांनी आयुष्य खर्ची घातले, त्यांच्या त्यागाचे हे प्रतीक आहे. राम मंदिराकडून आस्था, श्रद्धा आणि संकल्पाची प्रेरणा मिळते. त्यामुळे राम मंदिर राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज अयोध्येतील राम मंदिराचे भूमिपूजन पार पडले. त्यानंतर मोदींनी देशवासियांना संबोधित केले. मोदी म्हणाले, आज संपूर्ण देश प्रभू रामांच्या भक्तीत रंगून गेला आहे. शरयू नदीच्या काठावर सुवर्ण इतिहास लिहिला गेला. आजचा दिवस राम मंदिरासाठी आयुष्य खर्ची घालणाऱ्यांना आपण अर्पण करू. राम मंदिर संस्कृतीचे आधुनिक प्रतीक असेल.
राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार झाल्याचा अभिमान आहे. कित्येक वर्षांचे स्वप्न आज साकार झाले.
प्रभू राम भारतासाठी ऊर्जास्त्रोत आहेत. राम आधुनिकता आणि परिवर्तनाचे समर्थक आहेत. काळानुसार चालणे ही प्रभू रामांची शिकवण आहे. त्यामुळे राम मंदिर देशाला एकजूट करण्याचा प्रयत्न करेल. हे मंदिर अनंतकाळ भारतीयांना प्रेरणा देईल.