प्रतिनिधी / मंडणगड
रायगड जिल्ह्यातून मंडणगड तालुक्यात खैराची अवैध चोरटी वाहतूक करणारा आयशर ट्रक मंडणगड पोलीस स्थानकाच्यावतीने 24 डीसेंबर 2020 रोजी रात्री 11.33 वाजता ताब्यात घेण्यात आला. पोलीस निरिक्षक सुशांत वराळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या धडक कारवाई संदर्भात पोलीस स्थानकातून देण्यात आलेल्या माहीतीनुसार पोलीस नाईक अमर मोरे यांनी या संदर्भात तक्रार दिली आहे.
खैर वृक्ष या अतिसंरक्षीत वृक्षाची तोड तसेच वाहतूकी करण्याची परवानगी नसताना संरक्षित वनक्षेत्रातून चोरुन त्याची साल काढून व शासनाचे शुल्क चुकवून महाड तालुक्यातील तलोशी ते मंडणगड तालुक्यातील दहागाव येथे खैराची चोरटी तस्करी करत असताना आयशर गाडी नंबर एम.एच.0.4 एफ. जे. 2541 या नंबर चा ट्रक खैराची वाहतूक करीत असताना (24) रोजी दुधेरे गावानजीक केलेल्या कारवाईत आढळून आला. त्यामुध्ये 9080 किलोग्रॅम वजनाचे 5 लाख 44 हजार 800 रुपयांचे सोललेले खैराची लाकडू सापडले.
पोलीसांनी या कारवाईत महादेव काशानीथ साळवी, दीनेश प्रकाश गुढेकर, दोन्ही राहणार नांदगाव खुर्द तालुका महाड, भरत मोरे राहणार तलोशी, श्री.पाकळे राहणार दहागाव यांच्यावर भा.द.वि. कलम 379, 34 सह भारतीय वनकायदा 1927 कलम 26(1) (अ) (फ) 14 (2) (ख) स 42 सह महाराष्ट्र वन नियमावली कलम (81) प्रमाणे गुन्हा नोंद केला आहे. ट्रक व खैर असा एकूण 7लाख 44 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.