प्रतिनिधी / सातारा :
रायगाव (ता. जावली) येथील टीआर कॉर्पोरेशन कंपनीत मर्ढे येथील राजेंद्र धुमाळ हा दारु पिवून कामावर येत होता. त्यामुळे कंपनी मालक महेश सोनावणे यांनी त्याला कामावर येवू नको असे सांगितल्यावर चिडून त्याने कंपनीच्या गेटवरच आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने सोनवणे यांना बॅट, लोखंडी रॉड आणि दांडक्याने बेदम मारहाण केली. यात महेश सोनावणे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी तिघांवर भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, महेश सोनावणे यांनी 3 महिन्यापुर्वी रायगाव (ता.जावली) येथील प्लॉट नं 462 या ठिकाणी अमोल भरत सांळुखे (रा. अमरलक्ष्मी कोडाली) याच्यासोबत भागीदारीत टीआर काँर्पोरेशन युनिट-2 नावाची काँपर कास्टिंग कंपनी सुरु केली आहे. त्या कंपनीत 12 कामगार काम करत आहेत. त्या कंपनीत राजेंद्र धुमाळ हा कामगार सुमारे 1 वर्षापासुन काम करीत आहे. त्याला दारुचे व्यसन असल्याने तो वांरवार दारु पिवुन कामावर येत होता. त्यामुळे दोन दिवसापुर्वी राजेश धुमाळ यास सोनावणे यांनी तू दारु पिवुन कामावर येवु नको असे सांगुन त्याला कंपनीतून बाहेर काढले होते. त्यामुळे तो चिडुन होता. दि 14 रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास सोनावणे हा कंपनीत गेला असता त्यावेळी कंपनीच्या गेटच्या आत शटरजवळ राजेश धुमाळ, साहिल गोरे व आणखी एक अनोळखी तरुण असे तिघेजण उभे होते. त्यांनी बॅट, लोखंडी रॉड आणि दंडक्याने सोनावणे यास मारहाण करत त्यांच्या खिशातील 80 हजार 400 रुपये जबरदस्तीने काढुन घेतले. त्यानंतर सोनावणे कंपनीच्या पाठीमागील अश्विनी पँकेजिंग कंपनीत गेले. त्याठिकाणी त्या कंपनीचे मालक विक्रम पाटील यांनी सोनावणे यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले.