तामिळनाडू निवडणूक – चेन्नई शहरातील मतदारसंघ
तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत चेन्नई शहराच्या उत्तर भागातील रायपुरम मतदारसंघ विरोधी पक्ष द्रमुकसाठी प्रतिष्ठेचा ठरला आहे. या मतदारसंघात विजय मिळविण्यासाठी द्रमुक जोरदार प्रयत्न करत आहे. पक्षाने 2001 साली हा मतदारसंघ गमावला होता. तेव्हापासून या मतदारसंघावर अण्णाद्रमुकचा कब्जा आहे. तामिळनाडूत 234 विधानसभा मतदारसंघांसाठी 6 एप्रिल रोजी मतदान होणार असून 2 मे रोजी मतमोजणी केली जाणार आहे.
अण्णाद्रमुकचे वरिष्ठ नेते आणि राज्याचे मत्स्यपालन मंत्री डी. जयकुमार यांनी या विधानसभा मतदारसंघांत सलग चार निवडणुकांमध्ये द्रमुक आणि त्याचा सहकारी पक्ष काँग्रेसच्या उमेदवारांना पराभवाची धूळ चारली आहे. रायपुरम मतदारसंघात द्रमुक आणि काँग्रेस उमेदवारांना सातत्याने नामुष्कीजनक पराभव पत्करावा लागत आहे.
या मतदारसंघातील जयकुमार यांचे समर्थक त्यांना ‘डीजे अण्णा’ म्हणतात. 1996 मध्ये द्रमुकचे आर. मथिवानन यांनी त्यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव केला होता. त्यावर्षी सत्तारुढ अण्णाद्रमुकला सत्ताविरोधी लाटेला तोंड द्यावे लागले होते. मथिवानन यांनी या मतदारसंघात पहिल्यांदा 1991 मध्ये मोठा विजय मिळविला होता. त्यानंतर जयकुमार यांनी 2001 च्या निवडणुकीत विजय प्राप्त केला, त्यानंतर 2006, 2011 आणि 2016 मध्येही अण्णाद्रमुकने येथे विजय मिळविला होता.
जयकुमार यांची प्रचाराची पद्धत गर्दी खेचणारी आहे. चेहऱयावर सदोदित स्मितहास्य ठेवणारे माजी विधानसभा अध्यक्ष पांढरी टोपी परिधान करणे चुकवत नाहीत. अशीच पांढरी टोपी पक्षाचे संस्थापक आणि माजी मुख्यमंत्री एम.जी. रामचंद्रन परिधान करायचे. जयकुमार लोकांशी संलग्न होण्यासाठी रामचंद्रन यंच्या चित्रपटातील प्रसिद्ध गाणी देखील म्हणतात. जयकुमार यांनी अलिकडेच प्रचार केल्यावर घरी परतताना तरुणांसोबत कबड्डी खेळून सर्वांना चकित केले होते.
या मतदारसंघात त्यांना द्रमुकचे 54 वर्षीय उमेदवार आर. मूर्ती आव्हान देत ओत. ते आयड्रीम्स सिनेमाज आणि आयड्रीम्स मालमत्तांचे मालक आहेत. आम्ही अद्याप पेयजल आणि सांडपाणी निचऱयाची योग्य व्यवस्था नसल्याने अडचणींना तोंड देत आहोत. काही भागांमध्ये सांडपाणी पेयजलात मिसळून जात असल्याचे मूर्ती म्हणाले.
तर स्वतःच्या बालेकिल्ल्यामधून सातव्यांदा निवडणूक लढणारे जयकुमार स्वतःच्या विजयाबद्दल आश्वस्त आहेत. 6 एप्रिल रोजी होणाऱया निवडणुकीसाठी या मतदारसंघात एकूण 26 उमेदवार आहेत.