स्थानिक नगरसेवकाकडून संताप, नगराध्यक्षांकडून साफसफाईचे आश्वासन
प्रतिनिधी /मडगाव
मडगाव पालिका क्षेत्रातील रावणफोंडजवळील रिंग रोड नजीकच्या खुल्या जागेत कचरा, माती, कापलेली झाडे-झुडपे बेकायदा टाकण्याचे प्रकार वाढले असून या ठिकाणाला मिनी सोनसडय़ाचे स्वरूप प्राप्त झ?ाले आहे. स्थानिक नगरसेवक दामोदर शिरोडकर यांनी य?ा प्रकारांबाबत संताप व्यक्त केला आहे. गुरुवारी नगराध्यक्ष लिंडन पेरेरा यांना बोलावून त्यांनी पालिकेमार्फत त्वरित या भागाची साफसफाई करण्याची मागणी केली असता नगराध्यक्ष पेरेरा यांनी साफसफाई करण्याचे आश्वासन दिले.
या पाहणीच्या वेळी उपनगराध्यक्षा दिपाली सावळ उपस्थित होत्या. रावणफोंड रेल्वे उड्डाणपुलाच्या जवळील जागेत पंचायत भागातील कचरा टाकण्याचे प्रकार मागील कित्येक वर्षांपासून सुरू आहेत. त्यामुळे हा परिसर ’ब्लॅक स्पॉट’ बनला आहे. पालिकेला तेथील कचरा उचल करणे भाग पडते. अलीकडे मातीचे भराव, कापलेल्या झाडांच्या फांद्या, पालापाचोळा टाकण्याचे प्रकार वाढले आहेत याकडे नगराध्यक्षांचे लक्ष वेधताना नगरसेवक शिरोडकर यांनी संताप व्यक्त केला.
त्वरित येथे साफसफाई करून परिसर स्वच्छ करावा तसेच जवळच्या पंचायतीसह पालिका भागातील लोकांकडून येथे टाकावू साहित्य टाकण्याचे प्रकार वाढल्याने येथे पाळत ठेवून दंडात्मक कारवाई करण्याची गरज नगरसेवक शिरोडकर यांनी बोलून दाखविली. यापूर्वी पालिकेकडून रात्रीच्या वेळी पाळत ठेवण्याची मोहीम राबवून कित्येकांना रंगेहाथ पकडून दंड ठोठवण्यात आलेला आहे. अशी मोहीम पुन्हा राबविण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.
या रिंग रोडच्या ठिकाणी वॉकिंग ट्रक बनविण्यात येत असून या भागाचे सौंदर्यीकरण करण्यासाठी विकासकामे सुरू आहेत. कंत्राटदाराच्या रेती, खडीसारख्या बांधकाम साहित्यांवरही टाकावू माल टाकला जात असून तशी कैफियत कंत्राटदाराने आपल्याकडे मांडल्याची माहिती नगरसेवक शिरोडकर यांनी दिली.
जागा पूर्ववत स्वच्छ करू :नगराध्यक्ष
या ठिकाणी टाकण्यात आलेला झाडांच्या फांद्या तसेच पालापाचोळा व अन्य कचरा आपण सर्वप्रथम उचलण्यास सेनिटरी विभागाला सांगितले आहे. त्यानंतर जेसीबी वापरून मातीचे भराव व अन्य साहित्य हटविण्यात येऊन ही जागा पूर्वीप्रमाणे स्वच्छ केली जाईल, असे नगराध्यक्ष पेरेरा यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.