ऑनलाईन टीम / कोलंबो :
रावणाने पाच हजार वर्षापूर्वी पहिले विमान उड्डाण केल्याचा दावा श्रीलंका सरकारने केला आहे. तसेच यासंदर्भात अधिक माहिती समोर आणण्यासाठी श्रीलंकेच्या पर्यटन आणि नागरी उड्डाण मंत्रालयाकडून एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीतून लोकांनी रावणासंबंधी उपलब्ध कोणतीही माहिती, कागदपत्रे आणि पुस्तके सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
श्रीलंकेच्या नागरी उड्डाण प्राधिकरणाचे माजी उपाध्यक्ष शशी दानतुंज यांनी म्हटले आहे की, रावण हा एक महान राजा होता. अलौकिक बुद्धिमत्ता असलेल्या या राजाने पाच हजार वर्षापूर्वी पहिले विमान उड्डाण केले होते. रावण श्रीलंकेतून भारताकडे गेला. तिथून पुन्हा हो विमानाने परत श्रीलंकेत आला. ही पौराणिक कथा नसून तथ्य आहे. यावर सविस्तर संशोधन होण्याची गरज आहे. पुढील पाच वर्षात आम्ही हे सिद्ध करु.
मागील वर्षी श्रीलंकेतील काटुनायकेमध्ये नागरी विमान उड्डाण तज्ञ, इतिहासकार, पुरातत्वशास्त्रज्ञ यांची एक परिषद झाली. या परिषदेत रावणाने पाच हजार वर्षांपूर्वी विमान उडवल्याचा निष्कर्ष काढण्यात आला होता. त्यानंतर या संदर्भातील माहिती जमवण्यास श्रीलंकेने सुरुवात केली आहे.