अभिनेत्री राशि खन्ना सध्या ‘रुद्र ः द एज ऑफ डार्कनेस’मुळे चर्चेत आली आहे. ही वेबसीरिज अत्यंत यशस्वी ठरली असून अजय देवगण सोबत राशि खन्नाच्या अभिनयाचे कौतुक करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राशिने स्वतःच्या कारकीर्दीबद्दल मन मोकळे केले आहे. वेगळय़ा भाषांमध्ये काम करण्याचा अनुभव चांगला होता असे तिने दाक्षिणात्य चित्रपटांबद्दल बोलताना म्हटले आहे.
राशिने बॉलिवूडमध्ये जॉन अब्राहम सोबतचा चित्रपट ‘मद्रास कॅफे’द्वारे पदार्पण केले होते. कारकीर्दीच्या प्रारंभी चित्रपटसृष्टीत तिचा कुणीच गॉडफादर नवहता. ती कुणालाच ओळखत नव्हती. तिने स्वतःचा मार्ग निवडून मेहनत करत गेल्याने ती आता यशस्वी अभिनेत्री म्हणून ओळखली जातेय. हे सर्व देवाच्या कृपेमुळे घडल्याचे तिचे मानणे आहे.
स्वतःवर विश्वास न ठेवणे आणि मनात एक भीती बाळगण्याचा प्रकार राशिला कारकीर्दीच्या प्रारंभी फारच जाणवत होता. एका मागोमाग एक चित्रपट फ्लॉप होऊ लागल्यावर नवे चित्रपट मिळणे बंद होऊ लागते. केवळ तुमचे यशच महत्त्वाचे ठरते असे राशिने म्हटले आहे.
एखादे काम किंवा ऑफर आवडत नसल्यास त्याला नकार देणे हे मी जॉन अब्राहमकडून शिकले आहे. जीवनात कुठल्या गोष्टीला नकार द्यायचा हे जाणून घेणे अत्यंत आवश्यक असते असे तिने नमूद केले आहे. राशि खन्ना लवकरच ‘योद्धा’मध्ये सिद्धार्थ मल्होत्रा आणि दिशा पाटनी यांच्यासोबत दिसून येणार आहे.