वटवृक्ष कोसळून शिक्षकाचा मृत्यू
प्रतिनिधी / राय
राशोल येथे शुक्रवारी भला मोठा वटवृक्ष कोसळला आणि त्याच्याखाली सोनारवाडो- राय येथील निवृत्त शिक्षक रुझारियो कामिलो फर्नाडिस (81) यांना मृत्यू आला.
शुक्रवारी दुपारच्या सुमाराला ही घटना घडली. फर्नाडिस हे दुचाकीने राशोलच्या बाजूने जात होते. राशोल गावात प्रवेश करायचा झाल्यास राशोल सेमिनारीच्या प्रवेशद्वारातून जावे लागते. या प्रवेशद्वाराजवळच असलेला भला मोठा वटवृक्ष कोसळला त्याचवेळी फर्नाडिस तेथून जात होते. ते वटवृक्षाखाली चिरडले गेले. झाडाच्या फांद्या लागून ते गंभीररित्या जखमी झाले.
मडगावहून अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी अथक मेहनत घेऊन कोसळलेला वटवृक्ष कापून बाजूला केला. या झाडाखाली फर्नाडिस हे दुचाकीवर चिरडल्या अवस्थेत होते. जवानानी त्यांना बाहेर काढून तातडीने मडगावच्या सरकारी इस्पितळात नेण्याची सोय केली. तेथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले. नंतर त्यांना बांबोळी गोमेकॉत नेण्याची शिफारस करण्यात आली. तेथे नेत असताना वाटेतच त्यांना मृत्यू आला. बांबोळी येथील डॉक्टरांनी त्यांना ‘मृतावस्थेत आणले’ अशी नोंद केली.
यंदाच्या पावसामुळे झालेल्या दुर्घटनेतील फर्नाडिस हे गोव्यातील पहिले बळी ठरले आहेत. त्यांच्या अशा प्रकारच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. फर्नाडिस हे एक अतिशय उत्कृष्ट गणित शिक्षक होते. सोनारवाडो -राय येथील प्रसिद्ध मोटर मॅकानिक लुईस फर्नाडिस यांचे ते वडिल होत.