वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
2022 साली होणाऱया बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेचे क्वीन्स बॅटन रिले 12 ते 15 जानेवारी दरम्यान दिल्ली, अहमदाबाद, बेंगळूर आणि ओडिशा या चार शहरामध्ये आयोजित केल्याची माहिती भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या प्रवक्त्याने दिली.
बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडास्पर्धा क्वीन्स बॅटन रिलेचा चार दिवसांचा प्रवास भारतामध्ये होणार आहे. या बॅटन रिलेच्या आंतरराष्ट्रीय प्रवासामध्ये 72 देशांचा समावेश राहील, अशी माहिती अखिल भारतीय ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष नरिंदर बात्रा यांनी दिली आहे. क्वीन्स बॅटन रिले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अखिल भारतीय ऑलिंपिक संघटनेने तीन सदस्यांची एक समिती नियुक्त केली आहे. या समितीमध्ये राकेश गुप्ता, मुकेशकुमार आणि हरी ओम कौशी यांचा समावेश आहे. 12 जानेवारीला क्वीन्स बॅटन रिलेला दिल्लीतून प्रारंभ होणार असून 13 जानेवारीला अहमदाबादमध्ये, 14 जानेवारीला बेंगळूर आणि 15 जानेवारीला ओडिशा शहरामध्ये रिले होणार आहे. क्वीन्स बॅटन रिलेचा एकूण प्रवास 269 दिवसांचा असून या प्रवासात ते 140,000 कि.मी. अंतर पार करणार आहेत. सुमारे 7500 ऍथलीट्स या बॅटन रिलेचे सहभागी होतील. 2022 साली 28 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडास्पर्धा होणार असून या स्पर्धेत 72 देशांचे सुमारे 4500 खेळाडूं सहभागी होणार आहेत.