वृत्तसंस्था /अयोध्या :
राष्ट्रकुल सदस्य देशांच्या प्रतिनिधींसह विविध राज्यांच्या विधानसभांचे अध्यक्ष 18 जानेवारी रोजी अयोध्येच्या दौऱयावर जाणार आहेत. हे सर्व जण रामलल्लाचे दर्शन घेणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अयोध्येला जाणारे हे पहिले आंतरराष्ट्रीय प्रतिनिधिमंडळ असणार आहे. संसदीय संमेलनात भाग घेणाऱया सर्व सदस्यांचा अयोध्या भ्रमंती कार्यक्रम पहिल्यांदाच आखण्यात आला आहे. या दौऱयात विदेशी प्रतिनिधींना अयोध्येच्या पौराणिक महत्त्वाची जाणीव करून देण्यात येणार आहे.
उत्तरप्रदेशची राजधानी लखनौ येथे राष्ट्रकुल देशांच्या संसदीय प्रतिनिधींचे संमेलन 16 ते 19 डिसेंबर या कालावधीत आयोजित होणार आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हे संमेलनाचे नेतृत्व करणार असून राज्यसभा उपसभापतीही यात भाग घेणार आहेत. संमेलनात सर्व राज्यांच्या विधानसभांचे प्रतिनिधी तसेच राष्ट्रकुल देशांचे प्रतिनिधी निरीक्षकाच्या स्वरुपात सामील होणार आहेत.
लोकसभ-राज्यसभेचे पथक
संमेलनात विधानसभांचे अध्यक्ष आणि विधानपरिषदेचे सभापती तसेच सचिवही सामील होतील. लोकसभा आणि राज्यसभेच्या प्रत्येकी 25 सदस्यांचे पथक यात सहभागी असेल. लोकसभेकडून हे संमेलन आयोजित केले जाणार आहे.
अयोध्येचा दौरा
संसदीय व्यवस्थेच्या विविध मुद्दय़ांवर विचारविनिमय करण्यासह हे प्रतिनिधी अयोध्येला जाणार आहेत. एकूण 14 सदस्यांपैकी 120 जणांनी लखनौच्या दौऱयास सहमती दर्शविली आहे. अयोध्येतील भूमी वादासंबंधी सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने राममंदिराच्या बाजूने निर्णय दिला होता. मंदिर उभारणीसाठी 3 महिन्यात ट्रस्ट निर्माण करण्याचा आदेश घटनापीठाने दिला आहे.