कोलकाता ः
भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याविषयी तृणमूलच्या एका मंत्रिमहोदयांनी वादग्रस्त विधान केल्यामुळे जोरदार राजकीय गदारोळ निर्माण झाला आहे. यासंबंधीचा व्हिडीओ आता सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे. पश्चिम बंगाल मंत्रिमंडळातील एक मंत्री आणि तृणमूलचे नेते अखिल गिरी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर सोशल मीडियावरही बऱयाच जणांनी त्यांना लक्ष्य केले. त्यानंतर गिरी यांनी आपण केलेल्या वक्तव्याप्रकरणी दिलगिरी व्यक्त केली. मात्र, तृणमूल काँग्रेसने यासंबंधी कोणतेही भाष्य केलेले नाही. राष्ट्रपतींच्या पदाचा आदर, मान-सन्मान हा राखला गेलाच पाहिजे, अशा भावना सोशल मीडियावर व्यक्त होत आहेत. तर दुसरीकडे भाजपाकडून या विधानाचा समाचार घेतला जात असून तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनाही लक्ष्य केले जात आहे.