आयएनएस हंसाच्या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविणार
प्रतिनिधी/ पणजी, वास्को
वास्को येथील नौदल तळ आयएनएस हंसाला यंदा 60 वर्षे पूर्ण होत असून या हिरक महोत्सवाला हजर राहण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद दि. 5 सप्टेंबर रोजी गोवा भेटीवर येत असून गोव्यात त्यांचा तीन दिवस मुक्काम असणार आहे.
दि. 5 रोजी दुपारी 3 वा. राष्ट्रपती गोव्यात पोहोचतील. दाबोळी विमानतळावरुन बांबोळी येथे गोवा विद्यापीठातील आवारात असलेल्या हेलीपॅडवर उतरुन दोनापावला येथील राजभवनवर जातील. तेथे त्यांचा मुक्काम असेल. दि. 6 सप्टेंबर रोजी आयएनएस हंसाच्या हिरकमहोत्सवी समारंभाला सकाळी 9.30 वा. हजर राहणार आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते उद्या सोमवारी सकाळी आयएनएस हंस येथे भारतीय नौदल हवाई उड्डाण तळाला प्रेसिडेन्स कलर सन्मान प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी सादर करण्यात येणाऱया नौदलाच्या विशेष परेडमध्ये राष्ट्रपती सहभागी होणार आहेत.
याप्रसंगी राष्ट्रपतींच्या हस्ते टपाल खात्याद्वारे खास दिनाचे पोस्टल कव्हर जारी करण्यात येणार आहे. या सोहळय़ाला राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, नौदल प्रमुख आणि इतर नागरि व लष्करी अधिकारी उपस्थित राहणार आहेत. प्रेसिडेन्स कलर हा भारतीय सुरक्षा दलाला दिला जाणारा उच्च दर्जाचा सन्मान असून सुरक्षा दलानी केलेल्या असामान्य कर्तृत्वासाठी हा सन्मान प्रदान केला जातो. भारतीय सुरक्षा दलांमध्ये भारतीय नौदलाला हा सन्मान सर्वात प्रथम लाभला होता. 1951 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला होता. आतापर्यंत भारतीय नौदलाच्या दक्षिण, पूर्व, पश्चिम नौदल कमांड तसेच पूर्व व पश्चिम आरमार, आयएनएस शिवाजी व भारतीय नौदल अकादमीला प्रेसिडेन्स कलर सन्मान प्राप्त झालेला आहे. हा कार्यक्रम पूर्ण दिवस चालणार असून दुसऱया दिवशी दि. 7 सप्टेंबर रोजी सकाळी 11.20 वा. ते राष्ट्रपती भवन नवी दिल्लीकडे रवाना होणार आहेत.