नवी दिल्ली / वृत्तसंस्था
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजघाट येथे जाऊन त्यांना अभिवादन केले. तसेच काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह राजकीय नेते आणि केंद्रीय मंत्र्यांनीही अभिवादन करत त्यांच्या विचारांना उजाळा दिला. पूज्य बापू यांचे जीवन आणि आदर्श देशातील प्रत्येक पिढीला कर्तव्य पूर्ण करण्यासाठी प्रेरणा देतात. गांधी जयंतीनिमित्त मी आदरणीय बापू यांना वंदन करतो. बापूंची महान तत्व जागतिक पातळीवर आजही कालातीत आणि महत्त्वाची आहेत. ही तत्व लाखो नागरिकांना जगण्याची प्रेरणा देत आहेत; असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. पंतप्रधान मोदी यांनी भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनाही त्यांच्या जयंतीचे निमित्त साधून अभिवादन केले. मूल्य आणि तत्वांवर जगणाऱया माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रींचे जीवन आजही देशवासियांसाठी प्रेरणादायी आहे; असे ट्विट पंतप्रधान मोदी यांनी केले.