ऑनलाईन टीम / जळगाव :
राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करत याबाबत माहिती दिली.
ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. गत 6 दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वतःची कोविड चाचणी करून घ्यावी ही विनंती. पुढील उपचारासाठी मी मुंबईला रवाना होत आहे. तुम्हा सर्वांच्या सदिच्छा माझ्या सोबत असल्याने मी लवकरच बरा होऊन पुन्हा आपल्या सेवेत असेल. तसेच मी बरा होईपर्यंत भेटण्यास येऊ नये, असे आवाहनही एकनाथ खडसे यांनी यावेळी केले आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना कोरोनाची लागण झाली होती. रोहिणी खडसे यांनी ट्विट करुन ही माहिती दिली होती. प्रकृती उत्तम असून खबरदारी म्हणून रुग्णालयात दाखल होत असल्याची माहिती खुद्द रोहिणी खडसे यांनी दिली होती.
त्यानंतर आता एकनाथ खडसे यांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांच्या कुटुंबीयांना होम क्वारंटाइन होण्यास सांगितले आहे.