प्रतिनिधी/ सातारा
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जावलीतील सोसायटी मतदार संघातील निवडणूक आमदार शशिकांत शिंदे उमेदवार असल्याने चर्चेची ठरली होती. त्यांचा ज्ञानदेव रांजणे यांच्यासारख्या कार्यकर्त्याने केवळ मताने पराभव केल्यानंतर आमदार शिंदे समर्थकांचा संताप उफाळून आला. निकालानंतर संतप्त समर्थकांनी थेट बालेकिल्ल्यातील राष्ट्रवादीच्या कार्यालयावर दगडफेक केल्याने एकच खळबळ उडाली होती. या प्रकारानंतर आमदार शिंदे यांनी या प्रकाराबद्दल शरद पवार यांची मागितली पण पराभव आमदार शशिकांत शिंदे यांच्या जिव्हारी लागला असून त्यांनी पक्षातील काही नेत्यांवरच अप्रत्यक्ष शरसंधान साधलं आहे.
जिल्हा बँक निवडणुकीत आमदार शशिकांत शिंदे यांच्या झालेल्या पराभवामुळं त्यांचे समर्थक कमालीचे आक्रमक झाले असून त्यांनी थेट पक्षाच्या कार्यालयावरच दगडफेक केली आहे. शिंदे समर्थकांनी थेट पक्षालाच आव्हान दिल्याचं बोललं जात असताना, शिंदे यांनी मात्र वेगळी भूमिका मांडली आहे. ’माझ्या कार्यकर्त्यांकडून भावनेच्या भरात चूक झाली आहे. त्याबद्दल मी पवार साहेबांची माफी मागतो, पण माझ्या विजयासाठी प्रामाणिक प्रयत्न किती झाले याबद्दल मला शंका आहे, असंही शिंदे यांनी म्हटलं आहे. त्यामुळं येत्या काळात राष्ट्रवादीअंतर्गत संघर्ष पेटण्याची चिन्हं आहेत.
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार होते. मात्र, पक्षाचेच बंडखोर उमेदवार ज्ञानदेव रांजणे यांच्यामुळं त्यांना एका मतानं पराभव पत्करावा लागला. त्यामुळं संतापलेल्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या कार्यालयावर दगडफेक केली. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून शिंदे यांना मदत झाली नसल्याची कार्यकर्त्यांची भावना आहे.
शशिकांत शिंदे यांनी मात्र ही सगळी चर्चा फेटाळून लावली आहे. ’राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पवार साहेबांमुळंच माझी राजकीय ओळख आहे. कालच्या निवडणुकीत स्वतः शरद पवार साहेबांनी आणि अजितदादांनी माझ्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र, काही गोष्टी वेगळ्या घडल्या. आम्ही गाफील राहिलो, त्याचा फटका बसला, असं शिंदे म्हणाले. ’कार्यकर्त्यांकडून भावनेच्या भरात चुकीचं कृत्य झालं आहे. त्याबद्दल मी पक्षाच्या सर्व नेत्यांची दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो, असंही शिंदे म्हणाले.
माझ्या पराभवामागे मोठे कारस्थान
’मी पक्षाचा सच्चा कार्यकर्ता आहे हे शरद पवार साहेबांना माहीत आहे. एकनिष्ठ आहे, मी त्यांच्यासाठी जीव देईन. त्यामुळं कार्यकर्त्यांनी कुठलीही चुकीची भूमिका घेऊ नये, असं आवाहन शिंदे यांनी केलं. ’अजित पवारांसोबत झालेल्या बैठकीत माझं नाव निश्चित झालं होतं. मतदारांचा आकडाही मी समोर ठेवला होता. रामराजे निंबाळकर हे देखील बैठकीला होते. त्यांनी माझ्या विजयासाठी प्रयत्न केले, पण ते किती प्रामाणिक होते माहीत नाही. माझ्या पराभवामागे मोठं कारस्थान आहे. येत्या काळात ते समोर येईलच,’ असंही त्यांनी सांगितलं.
जावली कोणाच्या मागे हे कळेलच
’ज्ञानदेव रांजणे हे छोटे कार्यकर्ते आहेत. त्यांचा ’बोलविता धनी’ वेगळा आहे. जिह्यात माझा अनेक नेत्यांना अडसर आहे हे मला माहीत आहे. पक्षासाठी मी कुणालाही अंगावर घेतो हा माझा दोष आहे. जावलीची जनता कोणाच्या मागे आहेत हे कळेलच,’ अशा इशारा आमदार शशिकांत शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना दिल्याने आता भविष्यात सातारा-जावली विधानसभा मतदार संघात त्याचे पडसाद उमटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
दगड फेक करणाऱया महिलेसह सात जणांवर गुन्हा
जिल्हा बँकेच्या निवडणूकीत आमदार ज्ञानदेव रांजणे यांनी आमदार शशिकांत शिंदे यांचा एक मताने पराभव केला. हा पराभव शिंदे कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागल्याने कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कार्यालयावर दगड फेक केली. या दगडफेकीत बिचुकले गावचे सरपंच प्रशांत भिमराव पवार (वय 40 रा. कोरेगाव), दीपक आनंदराव गुजर (वय 42 रा. पिपोंडे खुर्दे), निलेश पोपट जगदाळे (वय 39 रा. अंबवडे), नरसिंग विष्णू दिसले (वय 48 रा. परतवडी), सुशिल वामनराव कदम (वय 34 रा. देऊर), कृषी उत्पन्न बाजार समिती कोरेगाव संचालक शांताराम उत्तम दोरके (वय 44 रा. देऊर), राष्ट्रवादी किसान सेल तालुकाध्यक्ष निलेश मधुकर कदम (वय 39, पिपोंडे बुर्देक), राष्ट्रवादी महिला आघाडीच्या पदाधिकारी वैशाली प्रसाद सुतार (वय 42 रा. देऊर) यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.