ऑनलाईन टीम / मुंबई :
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि राज्यसभेचे खासदार शरद पवार यांनी मुंबईमधील जे. जे. रुग्णालयात कोरोनाची लस घेतली आहे. शरद पवार हे कोरोना प्रतिबंधक लस घेणारे महाराष्ट्रातील पहिले राजकीय नेते ठरले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, साधारण दुपारी तीनच्या सुमारास शरद पवार यांनी देखील जे. जे. रुग्णालयामध्ये येऊन लस घेतली आहे. सिरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड लस पवारांनी घेतली असून, लस घेतल्यावर 30 मिनिटे त्यांना डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.
ही लस घेण्यास पात्र असलेल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांनी लवकरात लवकर लस घेऊन कोरोना विरुद्धच्या लढ्यात सहभाग नोंदवावा, असे आवाहनही शरद पवार यांनी यावेळी केले आहे.
यावेळी शरद पवार यांच्यासोबत त्यांची कन्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यादेखील रुग्णालयात आल्या आहेत. त्यांनी देखील कोरोनाची लस टोचून घेतली. याशिवाय, जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता तात्याराव लहानेही यावेळी उपस्थित होते.
दरम्यान, आजपासून देशात करोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु झाला असून त्याअंतर्गत 60 वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. आज सकाळीच सात वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही दिल्लीमध्ये करोनाच्या लसीचा पहिला डोस घेतला.