प्रतिनिधी/ गडहिंग्लज
गडहिंग्लजच्या पंचायत समितीत भाजपच्या विरोधात राष्ट्रवादी, काँग्रेस आणि ताराराणी आघाडी यांचे दहा पैकी सात सदस्य संख्या असतानाही भाजपच्या प्रकाश पाटील यांना बिनविरोध करत तालुक्यात नवा इतिहास केला. राष्ट्रवादी, काँग्रेसचे बहुमत असतानाही भाजपला मिळालेले उपसभापती पद जिल्हय़ाच्या राजकीय वर्तृळात चर्चेचे झाले आहे.
गडहिंग्लज पंचायत समितीच्या काँग्रेसच्या उपसभापती इंदुमती नाईक यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या उपसभापती पदावर निवडीसाठी सोमवारी दुपारी तहसिलदार दिनेश पारगे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा पार पडली. सत्तारूढ गटाचे 10 पैकी 7 असताना 3 सदस्य असणाऱया भाजपचे प्रकाश पाटील यांना सत्तारूढ मंडळींनी उपसभापती पदी बिनविरोध करत सर्वांना राजकीय धक्का दिला आहे. सभापती रूपाली कांबळे, बीडीओ शरद मगर यांनी नवनिर्वाचीत उपसभापती प्रकाश पाटील यांचा सत्कार केला. या निवडीच्यावेळी राष्ट्रवादीच्या बनश्री चौगुले, श्रिया कोणकेरी हे 2 सदस्य गैरहजर राहिले. तर काँग्रेसचे विद्याधर गुरबे, इंदुमती नाईक, ईराफ्पा हसुरी, भाजपच्या जयश्री तेली, विठ्ठल पाटील, विजयराव पाटील यांची उपस्थिती होती. निवडीनंतर कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून आनंद साजरा केला.