प्रतिनिधी / वडूज :
वडूज येथील नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक बिनविरोध झाली. या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीचे सहकार्य घेत नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष पदावर अपक्ष उमेदवारांना संधी दिली. नगराध्यक्षपदी प्रभाग क्रमांक दोन मधील अपक्ष उमेदवार मनिषा रविंद्र काळे तर उपनगराध्यक्षपदी प्रभाग चार मधील अपक्ष उमेदवार मनोज कुंभार यांची बिनविरोध निवड झाली आहे.
या निवडणूकीत नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांना बिनविरोध होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सुनिल गोडसे, आरती काळे, स्वप्नाली गोडसे, रोशना गोडसे, शोभा वायदंडे तसेच वंचितच्या शोभा बडेकर, अपक्ष राधिका गोडसे यांनी जाहीर समर्थन दिले होते. तर ऐनवेळी काँग्रेसचे एकमेव नगरसेवक अभय देशमुख यांनीही गुलालात राहणेच पसंत केले.
निवड जाहीर होताच काळे व कुंभार समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलाल, भंडाऱ्याची उधळण करीत जल्लोषी मिरवणूक काढली. या मिरवणूकीत कोकण विभागाचे निवृत्त आयुक्त प्रभाकर देशमुख, ज्येष्ठ नेते दादासाहेब गोडसे, सुरेंद्रदादा गुदगे, प्रा. बंडा गोडसे, हर्षदा देशमुख, हिंदुराव गोडसे, काँग्रेसचे नेते अशोकराव गोडसे, डॉ. महेश गुरव, वंचितचे जिल्हाध्यक्ष शाकीरभाई तांबोळी आदींसह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.