माजी नगरसेवक कोरे व पुणेकर यांच्यात वादावादी : मुख्याधिकारी दालनात परस्परांच्या अंगावर धावले : सहकारी व मुख्याधिकाऱ्यांनी केली मध्यस्थी
प्रतिनिधी/इस्लामपूर
शहरातील व प्रामुख्याने नगरपालिका राजकारणातील राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी अनेक वर्षापासूनची आहे. पाच वर्षे हातातून सत्ता निसटूनही वर्चस्व आणि श्रेयवादाचा अंतर्गत संघर्ष कायम आहे. सध्या नगरपालिकेत प्रशासक कारकिर्द सुरु आहे. मुख्याधिकारी तथा प्रशासक वैभव साबळे यांच्या दालनात राष्ट्रवादीचे प्रमुख माजी नगरसेवकांची काही विषयांवर चर्चा सुरु असतानाच माजी जेष्ठ नगरसेवक संजय कोरे व पीरअली पुणेकर यांच्यात जोरदार वादावादी झाली. दरम्यान परस्परांच्या अंगावर धावून जात त्यांनी शिव्यांची लाखोली वाहिली. अखेर मुख्याधिकारी साबळे व सहकाऱ्यांनी मध्ये पडत हा वाद सोडवला.
गेली पाच वर्षे सत्ताधारी विकार आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात प्रचंड श्रेयवाद झाला. अनेकदा सभागृहाचा आखाडा बनला. सभागृहात बहुमत राष्ट्रवादीचे असल्याने लोकनियुक्त नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांना अपेक्षेप्रमाणे काम करता आले नाही. दोन गटात संघर्ष होत असतानाच राष्ट्रवादीच्या नगरसेवकांत ही अनेक गटतट राहिले. राष्ट्रवादीचे गटनेते म्हणून संजय कोरे हे होते. पण त्यांनी सभागृहातील चर्चेत सावध भूमिका ठेवली. सध्या पालिकेत प्रशासक असल्याने व काही महिन्यांवर निवडणूका होणार असल्याने आपआपल्या प्रभागातील विकास कामे करून घेण्याकडे प्रत्येक माजी नगरसेवकाचा कल आहे. अशाच काही प्रश्न व कामांवर चर्चा करण्यासाठी बुधवारी दुपारी कोरे, पुणेकर, विश्वनाथ डांगे, शहाजी पाटील, खंडेराव जाधव, माजी नगराध्यक्ष मुनीर पटवेकर हे एकत्र आले होते. मुख्याधिकारी साबळे यांच्या
दालनात चर्चा सुरु असतानाच अचानक कोरे व पुणेकर यांच्यात शाब्दीक चकमक सुरु झाली. या चकमकीने शिव्यांच्या लाखोलीत वळण घेतले. दरम्यान पुणेकर व पटवेकर हे कोरे यांच्यावर आक्रमक झाले. या वादावादी दरम्यानच्या मोठ-मोठया आवाजाने संपूर्ण नगरपालिका घुमली. मुख्याधिकारी तथा प्रशासक साबळे यांच्या दालन पहिल्या मजल्यावर आहे. त्या मजल्यावरील काही विभागप्रमुख, कर्मचारी त्यांच्या दालनाकडे धावले. केबीनमध्ये नेमका कुणा कुणात वाद सुरु आहे, हे सुरुवातीला अनेकांना समजले नाही. मात्र सहकारी नगरसेवक व मुख्याधिकारी साबळे हे हा वाद सोडवण्यासाठी सरसावले. तरीही काही काळ परस्परांना शिव्या देणे सुरुच होते. हा वाद नेमका कुठल्या विषयावरुन सुरु झाला. हे समजू शकले नाही.
मी ही अनभिज्ञ
राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचे मुख्याधिकारी दालनात वाद सुरु असताना मुख्याधिकारी वैभव साबळे तेथे उपस्थित होते. त्यांच्याशी संपर्क साधला असता, हा वाद कशामुळे सुरु झाला. याबाबत मी ही अनभिज्ञ आहे. त्यांच्या वैयक्तीक
कारणावरुन वाद झाला, असू शकतो, असे साबळे यांनी सांगितले.