खासगीकरणामुळे बँका बंद पडण्याची भीती : युनायटेड फोरम
प्रतिनिधी / पणजी
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे खासगीकरण करण्याच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी दोन दिवस राष्ट्रीयकृत बँकातील कर्मचारी – अधिकारी युनियनसनी संप पुकारला असून पणजीतील आझाद मैदानावर त्यांच्यातर्फे धरणे – निदर्शने करण्यात आली.
युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (गोवा) तर्फे हे आंदोलन करण्यात आले. विविध बँक युनियन्सच्या पदाधिकाऱयांनी तेथे भाषणे केली आणि खासगीकरणाच्या विरोधात निषेध नोंदविला. गोव्यातील बहुतेक सर्व राष्ट्रीयकृत बँका या संपात सहभागी झाल्या असून त्या बँकांचे व्यवहारही ठप्प झाले आहेत.
केंद्र सरकारतर्फे सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात 2 सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे खासगीकरणाची घोषणा करण्यात आली आहे. हा निर्णय एकतर्फी असून तो आम्हाला मान्य नाही. तसेच तो अन्यायकारक असून हे धोरण रद्द करावे, अशी मागणी पणजीत आझाद मैदानावर झालेल्या धरणे आंदोलनातून करण्यात आली. केंद्र सरकार व बँक व्यवस्थापन यांचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन आणि संप पुकारण्यात आला असून देश पातळीवर त्या विरोधात आवाज उठवण्यात आल्याची माहिती देण्यात आली. या खासगीकरणाचे विपरित परिणाम बँकांना, त्यातील कर्मचारी, अधिकारी वर्गाला भोगावे लागतील. बँका बंद पडतील अशी भीती युनायटेड फोरम (गोवा)चे निमंत्रक प्रसन्ना उटगी यांनी प्रकट करुन त्यास विरोध दर्शवला. यावेळी फ्रान्सिस सुवारीस, संतोष हळदणकर, नितीन ठाकुर, सुभाष नाईक – जॉर्ज, शामसुंदर सावंत, हरप्रीत सिंग, मॅक्सी परेरा यांची यावेळी भाषणे झाली.