नवी दिल्ली :
ध्यान चंद यांच्या स्मृतिप्रित्यर्थ साजरा केल्या जाणाऱया राष्ट्रीय क्रीडा दिनी यंदा प्रथमच राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांचे ‘व्हर्च्युअल’ अर्थात आभासी वितरण केले जाणार आहे. खेलरत्न पुरस्कार जेता रोहित शर्मा व अर्जुन पुरस्कार जेता इशांत शर्मा आयपीएल स्पर्धेसाठी दुबईत असल्याने ते हजर राहणार नाहीत तर काही पुरस्कार विजेते कोरोना पॉझिटिव्ह असल्याने ते देखील या ‘व्हर्च्युअल’ सोहळय़ाला मुकणार आहेत. जे खेळाडू प्रत्यक्ष हजर राहू शकणार नाहीत, त्यांना त्यांचे चषक नंतर प्रदान केले जातील.
’आज (दि. 29) सोहळय़ापूर्वी राष्ट्रपती राम नाथ कोविंद विजेत्या खेळाडूंचे अभिवादन करतील. यंदा कोरोना संकटामुळे या वितरण सोहळय़ाचे व्हर्च्युअल वितरण केले जाणार आहे. राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या इतिहासात देखील असा सोहळा व्हर्च्युअल आयोजित केली जाण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. या व्हर्च्युअल सोहळय़ानुसार, जे विजेते देशात आहेत, त्यांना त्यांचे चषक व मानपत्र त्यांच्या इच्छित स्थळी यापूर्वीच पाठवले गेले आहे. सोहळय़ाच्या वेळी हे खेळाडू ब्लेझरमध्ये असतील व चषक त्यांच्या समवेत असेल. पुरस्कार विजेते उभे राहतील आणि मानपत्राचे वाचन केले जाईल. राष्ट्रपती यानंतर स्क्रीनवर मानपत्र दर्शवतील. पुढे पुरस्कार जेते आपल्या चषकासह फोटो सेशनसाठी उभे राहतील’, असे भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साई) अधिकाऱयांनी एका पत्रकातून यावेळी नमूद केले आहे.
दिल्ली, मुंबई, कोलकाता, चंदिगढ, बेंगळूर, पुणे, सोनेपत, हैदराबाद व भोपाळ येथे साईची केंद्रे असून जे पुरस्कार जेते या व्हर्च्युअल सोहळय़ासाठी प्रवास करतील, त्यांची कोरोना चाचणी देखील घेण्यात आली आहे आणि त्यात तीन खेळाडू पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
जे खेळाडू पॉझिटिव्ह आहेत, ते व्हर्च्युअल सोहळय़ाला देखील हजर राहणार नाहीत, असे भारतीय क्रीडा प्राधिकरणाने यावेळी स्पष्ट केले. एकूण 9 पुरस्कार जेते क्वारन्टाईन असल्याने, पॉझिटिव्ह असल्याने, आजारी असल्याने किंवा देशाबाहेर असल्याने अशा विविध कारणांमुळे उपस्थित राहणार नाहीत, असेही साईने नमूद केले. यंदा 7 गटातून 74 पुरस्कार जेते असून त्यात 27 अर्जुन पुरस्कार जेत्यांचा समावेश आहे.