भारतीय क्रीडा प्राधिकरणांच्या 9 केंद्रावर जेत्यांचा गौरव, राष्ट्रपतींकडून ऑनलाईन अभिवादन, महिलांचा विशेष गौरव
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय क्रीडा इतिहासात राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांचे प्रथमच ‘व्हर्च्युअल’ वितरण करण्यात आले. राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी राष्ट्रपती भवनातून भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या 9 केंद्रांवर सर्व पुरस्कार जेत्यांचे अभिनंदन केले. राष्ट्रपतींनी आपल्या भाषणातून हॉकीपटू राणी रामपाल, टेबलटेनिसपटू मनिका बत्रा व कुस्तीपटू विनेश फोगट या महिला क्रीडापटूंचा यावेळी विशेष गौरव केला.
भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या दिल्ली, मुंबई, कोलकाता, चंदिगढ, बेंगळूर, पुणे, सोनेपत, हैदराबाद व भोपाळ या केंदांवरुन विविध पुरस्कार जेत्यांनी हजेरी दर्शवली. क्रीडामंत्री किरेन रिजिजू उपस्थित होते.
यंदाच्या खेलरत्न पुरस्कार विजेत्यांमध्ये क्रिकेटपटू रोहित शर्मा, मल्ल विनेश फोगट, पॅरा ऍथलिट मरियप्पन थंगवेलू, महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल, टेबलटेनिसपटू मनिका बत्रा यांचा समावेश राहिला. द्रोणाचार्य पुरस्कार जेत्यांमध्ये धर्मेंद्र तिवारी (तिरंदाजी), पुरुषोत्तम राय (ऍथलेटिक्स), शिव सिंग (मुष्टियुद्ध), रोमेश पठनिया (हॉकी), कृशन कुमार हुडा (कबड्डी), विजय भालचंद्र मुनिश्वर (पॅरा पॉवरलिफ्ंिटग), नरेश कुमार (टेनिस), ओम प्रकाश दहिया (कुस्ती) यांचा समावेश आहे.
याशिवाय, दुती चंद (ऍथलेटिक्स), अतानू दास (तिरंदाजी), चिराग शेट्टी (बॅडमिंटन), विशेष भ्रिगुवंशी (बास्केटबॉल), लोव्हलिना बोर्गोहेन (मुष्टियुद्ध), सुभेदार मनिष कौशिक (मुष्टियुद्ध), इशांत शर्मा (क्रिकेट), दीप्ती शर्मा (क्रिकेट), मनू भाकर (नेमबाजी), दत्तू भोकनाळ (रोईंग), सौरभ चौधरी (नेमबाजी), दिविज शरण (टेनिस), मधुरिका सुहास पाटकर (टेबलटेनिस), सावंत अजय अनंत (घोडेस्वारी), संदेश झिंगन (फुटबॉल), अदिती अशोक (गोल्फ), आकाशदीप सिंग (हॉकी), दीपिका (हॉकी), दीपक (कबड्डी), काळे सारिका सुधाकर (खो खो). दिव्या ककरण (कुस्ती), राहुल आवारे (कुस्ती), सुयश नारायण जाधव (पॅरा जलतरण), संदीप (ऍथलेटिक्स), मनीष नरवाल (पॅरा नेमबाजी) आदींना अर्जुन पुरस्कार प्राप्त झाला.
ध्यान चंद पुरस्काराचे मानकरी
कुलदीप सिंग भुल्लर (ऍथलेटिक्स), तृप्ती मुरुगुंडे (बॅडमिंटन), एन. उषा (मुष्टियुद्ध), अजित सिंग (हॉकी), मनप्रीत सिंग (कबड्डी), जे. रणजीत कुमार (पॅरा ऍथलेटिक्स), सत्यप्रकाश तिवारी (पॅरा बॅडमिंटन), मनजीत सिंग (रोईंग), दिवंगत सचिन नाग (जलतरण), नंदन बाळ (टेनिस), नेतरपाल हुडा (कुस्ती), लाखा सिंग (मुष्टियुद्ध), सुखविंदर सिंग संधू (फुटबॉल), जिन्सी फिलीप्स (ऍथलेटिक्स), प्रदीप श्रीकृष्ण गंधे (बॅडमिंटन) हे यंदा ध्यान चंद पुरस्काराचे मानकरी ठरले.
पुरस्कार जेत्याचे सोहळय़ापूर्वी निधन
बेंगळूर : यंदाच्या व्हर्च्युअल क्रीडा पुरस्कार वितरणाला काही तासांचा अवधी असतानाच द्रोणाचार्य पुरस्कार विजेते माजी भारतीय ऍथलेटिक्स प्रशिक्षक पुरुषोत्तम राय (वय 79) यांची प्राणज्योत शुक्रवारी मालवली. पुरुषोत्तम राय यांची यंदाच्या द्रोणाचार्य पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. बेंगळुरातील व्हर्च्युअल सोहळय़ासाठी ते दाखल झाले. अगदी सोहळय़ाची रंगीत तालीम झाली, त्यातही त्यांनी सहभाग घेतला होता. मात्र, प्रत्यक्ष सोहळय़ाला काही तास बाकी असताना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली.