क्रीडा प्रतिनिधी/ मडगाव :
ज्या घोषणेची प्रतिक्षा होती, ती 36व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा परत एकदा पुढे ढकलण्याची घोषणा क्रीडामंत्री बाबू आजगावकर यांनी काल गुरुवारी केली. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यास सद्यस्थितीत असमर्थ असल्याच्या निर्णयापर्यंत राज्य शासन काल आले. सध्या चलनी नाणे असलेल्या कोविडचे कारण स्पर्धा परत एकदा पुढे ढकलण्यास पुरेसे ठरले आहे. 100 वर्षांचा इतिहास असलेल्या या स्पर्धेच्या 35 व्या स्पर्धेचे आयोजन पाच वर्षांपूर्वी 2015 साली केरळात झाले होते.
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात कदापी होणार नाही, याबाबत शासन लवकरच घोषणा करणार असल्याचे वृत्त ‘तरुण भारत‘ने प्रथम दिले होते. कोविडची महामारी हे एक जरी कारण असले तरी सध्या केंद्र, गोवा शासन आणि सहभागी राज्यांची आर्थिक परिस्थिती तसेच राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनासाठी आवश्यक असलेल्या साधनसुविधा राज्य शासनाकडून वेळेवर निर्माण करण्यासही झालेला विलंब ही प्रमुख कारणे आहेत.
गुरुवारी सचिवालयात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आयोजन समितीची बैठक मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी क्रीडामंत्री आणि आयोजन समितीचे उपाध्यक्ष बाबू आजगावकर, सागचे कार्यकारी संचालक व्ही. एम. प्रभुदेसाई, क्रीडा सचिव जे. अशोककुमार, राज्याचे मुख्य सचिव परिमल राय तसेच विविध खात्याचे अधिकारी उपस्थितीत होते.
खेळाडूंच्या आरोग्याशी खेळू शकत नाही
आम्ही राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनासाठी तयार आहोत आणि यासाठी साधनसुविधाही तयार आहेत, मात्र आम्ही खेळाडूंच्या आरोग्याशी खेळू शकत नाही, असे यावेळी क्रीडामंत्री बाबू आजगावकर म्हणाले. येत्या ऑक्टोबर महिन्यात स्पर्धेचे आयोजन होऊच शकत नाही. कोविड महामारीची प्रगती पाहूनच राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाविषयी पुढील निर्णय घेण्यात येईल, असे ते म्हणाले.
आमच्या संघांची निवड झाली नाही. त्यांना सरावाची संधीही मिळाली नाही. विविध राज्यात कोविड महामारीने उच्छाद मांडला आहे यामुळे त्यांच्या सहभागाविषयीही अनिश्चितता आहेतच. गोव्यात स्पर्धेचे आयोजन झाले असते तर राष्ट्रीय घरच्या प्रेक्षकांसमोर चांगली कामगिरी करून दाखविण्याची चांगली संधी आमच्या ऍथलेट्सना होती, असे आजगावकर म्हणाले.
बैठकीत काही सदस्यांकडून राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाबाबत नवीन तारीख जाहीर करण्याची मागणीही शासनाकडे करण्यात आली, यावेळी मात्र नेहमीप्रमाणे आयोजनाची नवीन तारीख जाहीर करणे शासनाने टाळले.
सप्टेंबर महिन्यात घेणार आढावा
येत्या सप्टेंबर महिन्यात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आयोजन समितीची बैठक होणार असून यावेळी त्यावेळच्या कोविड महामारीच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात येईल. सर्व काही त्यावेळच्या परिस्थितीवर अवलंबवून असल्याचे सागचे कार्यकारी संचालक व्ही. एम. प्रभुदेसाई म्हणाले. गोवा शासन काल घेतलेल्या निर्णयाबद्दल प्रथम आयओएला कळविणार नाही तर क्रीडा मंत्रालयाला पत्र लिहून राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेबाबत आता काय करावे, यासाठी त्यांचा सल्ला मागणार आहेत.
दोन-तीन वर्षे तरी आयोजन नाही : भक्ता
सध्याच्या स्थितीत गोव्यात आणखी दोन तीन वर्षे तरी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन होणार नाही, असे गोवा ऑलिम्पिक संघटनेचे सचिव गुरुदत्त भक्ता म्हणाले. गोव्याने प्रत्येक वेळी विविध कारणे सांगून राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा पुढे ढकलण्यात यश मिळविले आहे. भारतीय क्रीडा वर्तुळाच्या इतिहासात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा सर्वांत जास्त वेळा पुढे ढकलण्याचा विक्रम आता गोव्याच्या नावावर नोंद झाला आहे, असे भक्ता यावेळी म्हणाले.
गोव्याला भारतीय ऑलिम्पिक संघटनेकडून 2008 मध्ये 2011 साली 36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाची संधी मिळाली होती. आता 9 वर्षे झाली मात्र अजुनही आमच्याकडून आयोजन होत नाही, हीच तर आमच्या राज्यातील क्रीडा संस्कृतीची शोकांतिका असल्याचे भक्ता म्हणाले. आयोजन मिळाले त्यावेळी एक तर वेळ ठिक नव्हती, असच आता खेदाने म्हणावे लागेल, असेही ते म्हणाले.
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय चांगला असल्याची प्रतिक्रिया गोवा फुटबॉल संघटनेचे सचिव ज्यॉवितो लोपीश यांनी दिली.