वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीमध्ये पुन्हा कोरोनाच्या रूग्णामध्ये झपाटय़ाने वाढ होत असल्याचे आढळून आल्याने अखिल भारतीय टेनिस संघटनेतर्फे देशातील नामवंत टेनिसपटूंसाठी 30 नोव्हेंबरपासून आयोजित केलेले राष्ट्रीय सराव प्रशिक्षण शिबीर लांबणीवर टाकण्याचा निर्णय गुरूवारी जाहीर करण्यात आला.
दिल्लीमध्ये थंडी सुरू झाल्याने कोरोनाचा प्रसार पुन्हा वाढत असल्याचे दिसून आले. दिल्लीमध्ये आतापर्यंत कोरोना रूग्णांची संख्या 5 लाख झाली असल्याची माहिती बुधवारी आरोग्य विभागातर्फे देण्यात आली. गेल्या काही दिवसामध्ये कोरोनाचा प्रसार दिल्लीमध्ये झपाटय़ाने वाढत असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान बुधवारी दिल्लीमध्ये एका दिवसात 134 जणांचा कोरोनाने बळी घेतल्याची नोंद झाली आहे. कोरोनाच्या भीतीमुळे अखिल भारतीय टेनिस संघटनेने देशातील अव्वल 20 इलाईट पुरूष आणि महिला टेनिसपटूंसाठी 30 नोव्हेंबरपासून आयोजित केलेले सराव शिबीर लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे. पुरूष टेनिसपटूंसाठी हे शिबीर 21 दिवसांचे घेतले जाणार होते तर महिला टेनिसपटूंच्या सराव शिबिराला 4 जानेवारीपासून प्रारंभ केला जाणार होता. दिल्लीतील कोरोना परिस्थिती संदर्भात चर्चा करण्यासाठी अखिल भारतीय टेनिस संघटनेने तातडीची बैठक घेऊन त्यामध्ये हे शिबीर लांबणीवर टाकण्याचा निर्णय जाहीर केला, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष अनिल खन्ना यांनी दिली. भारताचा टेनिसपटू सुमीत नागल जर्मनीत गेल्या कांही दिवसापासून टेनिस प्रशिक्षण घेत आहे तर पी. गुणेश्वरन आणि रामकुमार रामनाथन हे एटीपी चँलेंजर टूरवरील स्पर्धेसाठी विदेशात गेले आहेत.