निष्ठेने काम केलेल्यांना राष्ट्रीय पक्षाकडून अपमानास्पद वागणूक
बेळगाव / प्रतिनिधी
‘प्रथम ग्रासे मक्षिका पात हा’ अशी सध्या राष्ट्रीय पक्षांची अवस्था झालेली आहे निवडणुकीपूर्वीच काही जणांची हकालपट्टी करण्याची वेळ राष्ट्रीय पक्षांवर आलेली आहे. काँग्रेस पक्षाने निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून इतरांना तिकीट दिल्याने निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांनी बंडखोरी करून अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली. परंतु पक्षाने त्यांना अधिकृत उमेदवाराविरुद्ध उभे राहिले म्हणून पक्षातून निलंबित केले.
काँग्रेस पक्षाने जयराज हलगेकर आणि जयश्री माळगे यांना निलंबित केले काँग्रेसने ही कारवाई करत असताना भाजपही मागे राहिला नाही. भाजपने जाहीर केलेल्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध अपक्ष म्हणून उभे राहिलेल्या उमेदवारांना पक्षातून निलंबित केले. भाजपने एकूण सात जणांना पक्षातून निलंबित केले आहे. माजी महापौर शिवाजी सुंठकर यांच्यावरही कारवाई करण्यात आली. परंतु मराठी बाणा दाखवून मला अस्मिताही महत्त्वाची आहे, असे त्यांनी सुनावले. राष्ट्रीय पक्ष प्रथमच महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाग घेत आहे. परंतु पहिल्याच वेळी माशी शिंकली आणि निलंबनाची कारवाई करावी लागली असे चित्र आहे.
कारवाई झालेले सर्रास कार्यकर्ते मराठी भाषिक असून, मराठी भाषिकांवरच कारवाई करण्याचा बडगा दोन्ही राष्ट्रीय पक्षांनी उगारला आहे. त्यामुळे नि÷ावंत म्हणून पक्षासाठी काम केलेल्या कार्यकर्त्यांची अशी अवस्था राष्ट्रीय पक्षांनी केली आहे. मराठी भाषिक असल्याने कोणतीच दया दाखविण्याचा प्रयत्न राष्ट्रीय पक्षाच्या पदाधिकाऱयांनी केला नाही. त्यामुळे पक्षात काम करणाऱया मराठी भाषिकांवर कारवाई करून राष्ट्रीय पक्षांनी आपले खरे दात दाखवून दिले आहेत.
दरम्यान वीस-वीस वर्षे राष्ट्रीय पक्षांमध्ये निष्ठेने कार्यरत राहूनही पक्षातर्फे अशी अवमानास्पद वागणूक मिळाल्याने उमेदवारांमध्ये तर नाराजी आहे. परंतु कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा नाराजी पसरली आहे काही कार्यकर्ते संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. पक्षातील निष्ठावंतांवर अशी कारवाई होत असेल, तर या पक्षांच्या सोबत पुढे आपला निभाव लागेल का असा प्रश्नही कार्यकर्त्यांच्या गटागटामध्ये चर्चेत आहे.
कारवाई करण्यात आलेली नावे व वॉर्ड क्रमांक
- माजी महापौर शिवाजी सुंठकर, त्यांच्या पत्नी सुलोचना शिवाजी सुंठकर (वॉर्ड क्रमांक 47)
- माजी नगरसेवक दीपक जमखंडी ( वॉर्ड क्रमांक 41)
- शिवानंद मुगळीहाळ (वॉर्ड क्रमांक 46)
- सुरेश यादव (वॉर्ड क्रमांक 46)
- गणेश नंदगडकर (वॉर्ड क्रमांक 4)
- संजय सव्वाशेरी (वॉर्ड क्रमांक 49)
- आरती पाटोळे (वॉर्ड क्रमांक 19)
- शिवानंद मुरगोड (वॉर्ड क्रमांक 19)
- ज्योती भाविकट्टी (वॉर्ड क्रमांक 36)