मुंबई \ ऑनलाईन टीम
राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्री सुरेखा सिकरी यांचं आज हृदयविकाराच्या धक्क्याने मुंबईत निधन झालं. त्या ७५ वर्षांच्या होत्या. २०१८ मध्ये त्यांना अर्धांगवायूचा झटका आला होता. तसंच २०२० साली ब्रेन स्ट्रोकचा त्रासही त्यांना झाला होता. त्यामुळे निर्माण झालेल्या गुंतागुंतीमुळे त्यांची प्रकृती गंभीर होती. आज सकाळी त्यांची हृदयक्रिया बंद पडल्याने त्यांचं निधन झालं.
१९७८ सालामध्ये आलेल्या ‘किस्सा कुर्सा का’ या सिनेमातून सुरेखा यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर सुरेखा यांनी अनेक बॉलिवूडमध्ये सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत त्यांच्या अभिनयाची छाप पाडली. दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून त्यांनी अभिनयाचे धडे घेतले होते. त्यांना १९८९ साली संगीत नाटक अकादमीचा पुरस्कारही मिळाला होता. त्यांचे वडील भारतीय हवाई दलात होते तर आई शिक्षिका होती. त्यांनी हेमंत रेगे यांच्याशी लग्न केलं. या दोघांना राहुल नावाचा एक मुलगाही आहे.
सुरेखी सीकरी यांना आजवर तीन राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. ‘तमस’, ‘मम्मो’, आणि ‘बधाई हो’ या सिनेमातील भूमिकांसाठी त्यांमा बेस्ट सपोर्टिंग रोलसाठी राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. बॉलिवूड सिनेमांसोबत सुरेखा सीकरी यांनी छोट्या पडद्यावरदेखील त्यांच्या अभिनयाची कमाल दाखवली. त्यांची ‘बालिका वधू’ मालिकेतील ‘दादी’ ही भूमिका चांगलीच गाजली होती. व या भूमिकेमुळे त्या देशातील घराघरात पोहचल्या. या भूमिकेने त्यांना दादी ही ओळख दिली.