प्रतिनिधी/ बेळगाव
लेंडी नाल्याची खोदाई करावी यासाठी शेतकरी संघटनेने गेल्या वर्षभरापासून पाठपुरावा केला. त्यामुळे महानगरपालिकेने या नाल्याची खोदाई करण्यास सुरुवात केली आहे. आता राष्ट्रीय महामार्गाच्या पूर्वेकडील बाजूला असलेल्या लेंडी नाल्याच्या खोदाईला सुरुवात झाली असून शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नारायण सावंत यांच्या हस्ते या कामाचे पूजन करण्यात आले.
राष्ट्रीय महामार्गाच्या पूर्वेकडे असलेला नाला बळ्ळारी नाल्याला जाऊन मिळाला आहे. त्यामुळे हा नाला खोदाई करणे गरजेचे होते. नाला बुजल्यामुळे आणि नाल्यामध्ये उगवलेल्या झाडाझुडपांमुळे पाण्याचा निचरा होत नव्हता. त्यामुळे त्याची खोदाई करण्यास सुरुवात करण्यात आली.
महापालिका आयुक्तांकडून नाल्याची पाहणी
लेंडी नाल्याची खोदाई झाली तरच शहराला येणारा पूर कमी होणार आहे. त्यामुळे लेंडी नाल्याची खोदाई करावी, अशी शहरातील जनतेची मागणी आहे. लेंडी नाल्याचे पाणी शिवारात शिरून दरवषी शेकडो एकर जमिनीतील पिके खराब होत आहेत. त्यामुळे नाल्याची खोदाई करावी, अशी मागणी शेतकऱयांनी केली होते. काही शेतकऱयांनी अतिक्रमण केले होते. ते अतिक्रमण हटविण्यात आले आहे. अजून असलेले अतिक्रमणही हटविले जाणार आहे.
महापालिका आयुक्त जगदीश यांनी या नाल्याची पूर्ण पाहणी केली. जवळपास दोन तास त्यांनी या नाला परिसरात थांबून अधिकाऱयांना सूचना केल्या आहेत. यावेळी साहाय्यक कार्यकारी अधिकारी मंजुश्री, चौगुला, एम. डी. आरीफ, माने यांच्यासह महापालिकेचे इतर अधिकारी उपस्थित होते. शेतकरी संघटनेचे नारायण सावंत, सुनील जाधव, सुनील खन्नुकर, निळकंठ चौगुले, कळसण्णावर या शेतकऱयांनी समस्या सांगितल्या.