पेठ वडगाव / प्रतिनिधी
पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर वडगाव पोलीस ठाणे हद्दीत वाठार (ता.हातकणंगले) येथे कर्नाटकातील रोहीफसिंग बाबनसिंग टिक (वय २०, रा.चिकुर्डी, जि.बेळगाव) या युवकास धारधार शस्त्रे विक्रीसाठी घेवून जात असताना वडगाव पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून नऊ तलवारी व पाच चाकू व दुचाकी असा एक लाखाचा मुद्देमाल जप्त करून घातक शस्त्रास्त्र कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे.
या बाबत पोलीसातून घेतलेली माहिती अशी की, पेठ वडगाव पोलिसांना कर्नाटक राज्यातून दुचाकीवरून एक युवक धारदार शस्त्रे विक्रीसाठी घेवून किणी टोल नाक्याच्या दिशेने निघाला असल्याची गोपनीय माहिती माहिती वडगाव पोलिसांना मिळाली. या माहितीनुसार वडगाव पोलिसांनी महामार्गावर सापळा रचून दुचाकीवरून आलेल्या रोहीफसिंग बाबनसिंग टिक याला ताब्यात घेतले. त्याचेकडून नऊ धारदार तलवारी, पाच चाकू, मोटारसायकल जप्त करून त्याला अटक केली.
या प्रकरणी त्याचेवर घातक शस्त्रास्त्र जवळ बाळगल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केलेला रोहीफसिंग हा शस्त्रे विक्रीचा व्यवसाय करत असल्याची माहिती समजते. विना नंबर प्लेट दुचाकी घेवून हा युवक कर्नाटकातून महाराष्ट्र राज्यात आला आहे. ही शस्त्रे कोणाला विक्रीसाठी घेवून जाणार होता. तसेच या प्रकरणात आणखी कोणाचा समावेश आहे याचा तपास वडगाव पोलीस करत आहेत.
ही कारवाई जिल्हापोलीस प्रमुख शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, डीवायएसपी रामेश्वर वैंजने, पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बी.बी.पाटील, स्वाती सूर्यवंशी, पीएसआय अर्चना पाटील, सहाय्यक फौजदार दिपक पोळ, पोहेकॉ रवींद्र गायकवाड, पो.ना. रामराव पाटील, दादा माने, योगेश राक्षे, संदीप गायकवाड, प्रमोद चव्हाण, विकी भंडारे, सतिश सुतार, विकास घस्ते, रणवीर जाधव, विशाल हुबाले यांनी केली.