हेस्कॉमने तातडीने दुरुस्त करण्याची मागणी
प्रतिनिधी / बेळगाव
पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर काकती येथील बर्डे धाब्यानजीक महामार्गाशेजारीच विद्युतभारित खांब एका बाजूला कलंडल्याने वाहतुकीला धोकादायक बनला आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून या धोकादायक खांबाकडे दुर्लक्ष झाल्याने वाहनधारकांतून संताप व्यक्त होत आहे.
राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याशेजारी असलेला हा खांब एका बाजूला कलला आहे. त्यामुळे तो कधी रस्त्यावर पडेल याचा नेम नाही. याबाबत तक्रार करूनही
हेस्कॉमचे याकडे साफ दुर्लक्ष झाले आहे. महामार्गावर चोवीस तास वाहनांची ये-जा सुरू असते. त्यामुळे हा विद्युत खांब वाहनधारकांना धोकादायक ठरत आहे. रस्त्याच्या बाजूला कललेला हा खांब वादळी वाऱयामुळे पडून मोठी दुर्घटना घडू शकते. त्यामुळे हेस्कॉमने याकडे लक्ष पुरवून तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
राष्ट्रीय मार्गाशेजारी असलेल्या या विद्युत खांबावरून अतिउच्च प्रवाहाचा विद्युत पुरवठा होतो. त्यामुळे हा खांब कलंडल्यास मोठी दुर्घटना घडू शकते. याची दखल घेऊन हेस्कॉमने तातडीने हा खांब हटवून नवीन खांब उभारावा, अशी मागणी होत आहे.