वेदगंगा, हिरण्यकेशीच्या पाणीपातळीत घट : निपाणी, संकेश्वरमधून वाहतूक पूर्ववत
प्रतिनिधी /निपाणी, संकेश्वर
गेल्या 24 तासात पावसाने उघडीप दिल्याने वेदगंगा आणि हिरण्यकेशी नदीच्या पाणीपातळीत मोठी घट झाली आहे. यामुळे सोमवारी निपाणी-यमगर्णी आणि संकेश्वर राष्ट्रीय महामार्गावरील पाणी ओसरल्यामुळे महामार्ग वाहतुकीस खुला झाला आहे. यामुळे वाहनधारकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
पावसाने आता विश्रांती घेतल्याचे चित्र निपाणी परिसरात दिसून येत आहे. त्यामुळे वेदगंगा तसेच दूधगंगा नदीच्या पाणीपातळीत झपाटय़ाने घट होत असून सोमवारी सकाळी 11 नंतर पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. पावसामुळे वेदगंगा व दूधगंगा नदीचे पुराचे पाणी यमगर्णी तसेच कोगनोळीनजीक राष्ट्रीय महामार्गावर आले होते. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. व गुरुवारी रात्रीपासून महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता.
स्वच्छता मोहीम राबवा
संकेश्वर हिरण्यकेशी नदीकाठच्या लोकवस्तीत शिरलेले पाणी आता ओसरले आहे. यामुळे संकेश्वर नगर परिषदेने तातडीने स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे. निवारा केंद्रातील पूरग्रस्तांनी घराकडे परतण्यासाठी धावपळ सुरू केली आहे. त्यामुळे निवारा केंद्र मंगळवारपासून पूर्णपणे खुले होणार आहेत. पूरग्रस्त भागातील लोकवस्तीत कोणतीही रोगराई पसरु नये यासाठी जंतूनाशक फवारणी करण्याची गरज आहे.