महाराष्ट्राचा संघ जाहीर, आंतरराष्ट्रीय महिला मल्ल स्वाती शिंदे, भाग्यश्री फंड करणार प्रतिनिधित्व
फिरोज मुलाणी / पुणे :
आज झालेल्या महिला वरिष्ठ महिला निवड चाचणीत कोल्हापूरच्या महिला मल्लांनी ठसा उमटवला. आग्रा (उत्तरप्रदेश) येथे 23 व्या वरिष्ठ महिला फ्री-स्टाईल राष्ट्रीय कुस्ती होणार आहे. आंतरराष्ट्रीय मल्ल स्वाती शिंदे, भाग्यश्री फंड या स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीनेआज स्वर्गीय मामासाहेब मोहोळ कुस्ती केंद्र (कात्रज) येथे कोरोनाच्या सर्व नियमाचे काटेकोर पालन करूननिवड चाचणी स्पर्धा पार पडली. यावेळी कार्याध्यक्ष नामदेवराव मोहिते, सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, उपाध्यक्ष सर्जेराव शिंदे, तांत्रिक सचिव प्रा. बंकट यादव, ललित लांडगे, शेखर शिंदे, गणेश कोहळे,भरत मेकाल उपस्थितीत होते.
30 ते 31 जानेवारी अखेर आग्रा येथे राष्ट्रीय महिला कुस्ती स्पर्धा होणार आहे. गेल्या आठवड्यात झालेली मुलांची आणि आज पार पडलेली महिला निवड चाचणी ही पुढील काळात होणाऱ्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची रंगीत तालीम मानली जात. होती. मात्र कुस्तीगीर परिषदेने अटी शर्थीचे पालन करून निवड चाचणी यशस्वी पार पाडली.
महिला वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा निवड चाचणी स्पर्धा पार पडली. या चाचणीतून निवडलेला महाराष्ट्र संघ खालील प्रमाणे 50 किलो स्वाती शिंदे (कोल्हापूर), 53 किलो नंदिनी साळोखे (कोल्हापूर), 55 किलो दिशा कारंडे (कोल्हापूर), 57 किलो विश्रांती पाटील (कोल्हापूर), 59 किलो अंकिता शिंदे (कोल्हापूर), 62 किलो भाग्यश्री फंड (अहमदनगर), 65 किलो श्रुष्टी भोसले (कोल्हापूर), 68 किलो ऋतुजा संकपाळ (कोल्हापूर), 72 किलो प्रतीक्षा बागडी (सांगली), 76 किलो पौर्णिमा सातपुते (कोल्हापूर) या सर्व यशस्वी महिला कुस्तीगीराचे सर्वत्र कौतुक होत आहे.
निवड चाचणीवर कुस्तीपंढरीची छाप
एकूण दहा वजन गटात महिलांच्या अटीतटीच्या लढती झाल्या. राज्यातील विविध जिल्ह्यातील महिला कुस्तीगीर निवड चाचणीच्या आखाड्यात उतरल्या होत्या. मात्र, दहा पैकी आठ वजनगटात कोल्हापूरच्या पोरी भारी ठरल्या. जिगरबाज कामगिरीने पोरींनी कोल्हापूरचा डंका राज्यात वाजवला आहे.