क्रीडा प्रतिनिधी /मडगाव
मेरशीत कालपासून सुरू झालेल्या राष्ट्रीय मिनी फुटबॉल स्पर्धेत मुलांच्या 16 वर्षांखालील गटात महाराष्ट्र, तामिळनाडू ब आणि तेलंगणा संघाने विजय मिळविले. 19 वर्षांखालील यूथ गटात केरळ, तेलंगण, उत्तरप्रदेश, पूर्वांचल संघांनी विजय नोंदविले. या स्पर्धेचे आयोजन मिनी फुटबॉल असोसिएशन ऑफ गोवाने अंत्रुज आर्ट अँड स्पोर्ट्स आणि मेरशीच्या सेंट कायतान क्लबच्या सहकार्याने मेरशीतील क्रीडा खात्याच्या मैदानावर केले आहे.
19 वर्षांखालील यूथ गटात गोव्याचा केरळ रेड विरूद्धचा सामना 1-1 असा बरोबरीत सुटला. केरळने पश्चिम बंगालचा 4-0, तेलंगणने तामिळनाडूचा 1-0, उत्तरप्रदेशने उत्तर कन्नडचा 1-0, पूर्वांचलने केरळ रेडचा 2-0 तर तेलंगणने मध्यप्रदेशचा 6-0 गोलानी पराभव केला.
16 वर्षांखालील गटात महाराष्ट्रने तामिळनाडू रेड संघाला 1-0, तामिळनाडू ब्लू संघाने उत्तरप्रदेशचा 1-0 तर तेलंगणने मध्यप्रदेशचा 5-0 गोलानी पराभव केला. तेलंगण आणि महाराष्ट्र यांच्यातील लीग सामना गोलशून्य बरोबरीत संपला. स्पर्धेचे उद्घाटन सांतापूजचे आमदार टोनी फर्नांडिस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मिनी फुटबॉल असोसिएशन ऑफ गोवाचे अध्यक्ष गिरीष उस्कईकर, भारतीय मिनी फुटबॉल महासंघाचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.