प्रतिनिधी / बेळगाव
येथील राष्ट्रीय मिलिटरी स्कूलच्या वार्षिक हस्तलिखिताचे प्रकाशन मराठा लाईट इन्फंट्रीचे ब्रिगेडियर रोहित चौधरी (सेनामेडल) यांच्या हस्ते करण्यात आले. याचवेळी बारावी व दहावीच्या दोन विद्यार्थ्यांना त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पुरस्काराने गौरविण्यात आले. कॅडेट अंकित कुमार राय याला पुष्पा लावासा तर अक्षय पांडे या विद्यार्थ्याला उदय लावासा गौरविण्यात आले. यावेळी बोलताना ब्रिगेडियर चौधरी म्हणाले, या शाळेचे वातावरण अत्यंत सकारात्मक आहे. शाळेने सातत्याने नीतीमूल्यांसह शैक्षणिक दर्जा उंचावला आहे. सध्याच्या काळातसुद्धा प्रतिकूलतेवर मात करून शाळेने हस्तलिखित काढले ही अत्यंत स्वागतार्ह बाब आहे. विद्यार्थ्यांनी आपली ऊर्जा समाजात बदल घडवून परिवर्तन करण्यासाठी वापरावी. तसेच समाजात वावरताना उत्तम अशा संभाषण कौशल्याची कला आत्मसात करावी, असेही त्यांनी सांगितले.