वृत्तसंस्था/ नवी दिल्ली :
राष्ट्रीय मुष्टीयुद्ध शिबिराला पुढील महिन्यात पुन्हा प्रारंभ अपेक्षित असल्याचे प्रतिपादन भारतीय मुष्टीयद्ध संघटनेचे संचालक सांतियागो नीव्हा यांनी केले आहे. या शिबिराला काही अंशी फेरसुरूवात केली जाईल. कोरोना व्हायरस महामारीमुळे देशातील सर्व क्रीडास्पर्धा, प्रशिक्षण शिबीरे रद्द किंवा लांबणीवर टाकण्यात आली आहेत.
कोरोना व्हायरस प्रतिबंधक नियमांचे पालन करताना सोशल डिस्टन्सिंग राखणे महत्त्वाचे असल्याने जनतेकडून या नियमाचे नियमित पालन करणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले. सांतियागो नीव्हा हे 2017 पासून भारतीय संघाशी निगडीत आहेत. भारतीय मुष्टीयुद्ध दर्जा सुधारण्यासाठी हे राष्ट्रीय शिबीर महत्त्वाचे ठरणार आहे. या शिबिराला पुढील महिन्यात प्रारंभ करणे शक्य होईल, दरम्यान हे शिबीर अंशता घेण्याचा प्रयत्न राहील, असे नीव्हा यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. भारताच्या कोर ग्रूपने यापूर्वी ऑलिंपिकसाठी आपली पात्रता सिद्ध केली आहे. कोरोना व्हायरसमुळे पंतप्रधान मोदी यांनी घोषित करण्यात आलेल्या लॉकडाऊनची मुदत 3 मे रोजी संपणार आहे. कोरोना संदर्भात देशातील जनतेकडून गंभीर विचार केला जात नसल्याचे दिसून येते. पण या धोकादायक महामारीपासून प्रत्येक व्यक्तीला काळजी घेणे जरूरीचे आहे. अमेरिका, युरोपियन देशामध्ये कोरोना महामारीची स्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत असल्याचे दिसून येते. त्यामुळे भारतातील नागरिकांनी आपल्या देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी स्वत:ची काळजी घ्यावी, असे आवाहन नीव्हा यांनी केले आहे.
पतियाळातील राष्ट्रीय क्रीडा अकादमी केंद्रामध्ये नेव्हा यांचे सध्या वास्तव्य असून ते साईच्या प्रशिक्षकाकरिता ऑनलाईनद्वारे लेक्चर्स देत आहेत.