मडगाव : कन्याकुमारीत सुरू असलेल्या 31व्या राष्ट्रीय सीनियर टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेत गोव्याच्या पुरूष आणि महिला संघांनी उपान्त्य फेरीत प्रवेश मिळविला. या स्पर्धेचे आयोजन विवेकानंद कॉलेजच्या मैदानावर करण्यात येत आहे.
पुरूष गटातील उप-उपान्त्यपूर्व सामन्यात गोव्याने छत्तीसगडचा दोन विकेटने पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना छत्तीसगडने आपल्या डावात निर्धारीत 8 षटकात 7 बाद 42 धावा केल्या. गोव्यासाठी सागर गावडेने 16 धावात 4 तर अनुकूल नाईक व प्रसाद सतरकरने प्रत्येकी एक गडी बाद केला. उत्तरादाखल, गोव्याने राजदीप कुडाळकरच्या 17 आणि सागर गावडेच्या 14 धावांच्या बळावर 8 षटकात 6 बाद 43 धावा करून विजय मिळविला.
उपान्त्यपूर्व सामन्यात गोव्याने दादरा नगर हवेली संघाचा 31 धावांनी पराभव केला आणि आरमात उपान्त्य फेरी गाठली. गोव्याने प्रथम फलंदाजी करताना निर्धारीत 8 षटकात 4 बाद 66 धावा केल्या. गोव्यासाठी सूरज गावडेने 16, रितेश परबने 15 तर सागर गावडेने 18 धावा केल्या. त्यानंतर गोव्याने दादरा नगर हवेलीचा डाव 6.3 षटकात 35 धावात संपविला. गोव्यासाठी अनुकूल नाईकने 17 धावात 4 तर रितेश परबने 10 धावात 3 गडी बाद केले. गोव्याच्या महिला संघाने सुद्धा उपान्त्य फेरीत प्रवेश मिळविताना पूर्वांचलचा 6 विकेट्सनी पराभव केला. पूर्वांचलने प्रथम फलंदाजी करताना आपल्या डावात फक्त 36 धावा केल्या. गोव्यासाठी मधू गिरीने 9 धावात 2 तर दिशा कांबळीने 11 धावात 3 गडी बाद केले. त्यानंतर गोव्यानेश विजयासाठी आवश्यक 37 धावा 2 गडी गमवून पार केल्या. गोव्यासाठी दिशा कांबळीने 8 तर कृतिका गावकरने 7 धावा केल्या. गोव्याचा उपान्त्य फेरीत सामना छत्तीसगडशी होईल.