राष्ट्रीय, आंतराष्ट्रीय स्तरावर जायचे असेल तर गादीवरील कुस्तीची कास धरली पाहिजे. या बाबतीत सुधारणा झाल्याने आज राष्ट्रीय स्तरावरील विविध कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राच्या मल्लांनी अतिशय समाधानकारक कामगिरी केल्याने उत्तर भारतातील मल्लांच्या बरोबरीने महाराष्ट्राचे मल्ल राष्ट्रीय पातळीवर पाय रोवून उभे राहत आहेत. पारंपारिक कुस्ती बदलली आहे. त्यामुळे जिल्हास्तराप्रमाणे आता तालुकास्तरावर शासनाने मॅट उपलब्ध करुन दिल्या आहेत. जिल्हा क्रिडा कार्यालयाने सकारात्मक भूमिका घेतल्याने गावोगावी व्यायामासाठी जिम आणि मॅट उपलब्ध झाल्याने ग्रामीण भागातील मल्ल सुध्दा आता गादीवर सरावाला प्राधान्य देत आहेत. गादीवर सराव केल्यामुळे शालेय स्तरावरील विद्यार्थी तालुका जिल्हा पातळीवरील कुस्ती स्पर्धेत चमकदार कामगिरी करत आहेत. पुर्वी राष्ट्रिय स्तरावर मिळणाऱ्या एखाद्या दुसऱ्या पदकामुळे मल्लांची आणि कुस्तीची पिछेहाट होत होती. महाराष्ट्र राज्य कुस्तीगिर परिषदेने राष्ट्रिय स्तरावर आगेकूच करायची असेल तर ग्रामीण स्तरावर पायाभूत सुविधा उभ्या केल्या पाहिजेत अशा पध्दतीचा आराखडा अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या मार्फत शासनाला सादर केला होता. यामुळे गुणवत्ताधारक मल्लांना राष्ट्रिय पातळीप्रमाणे सरावाला संधी मिळत राहिल्याने महाराष्ट्रातील कुस्तीचे चित्र आज बदललेले दिसत आहे, असे पै. बाळासाहेब लांडगे यांनी ‘तरूण भारत’शी बोलताना सांगितले.
पुढे बोलताना बाळासाहेब लांडगे म्हणाले, कुस्तीगिर परिषदेने दोन वर्षात कुस्तीच्या निवड चाचणीत अमुलाग्र बदल केले आहेत. ऑनलाईन पध्दतीने रजिस्ट्रेशन करणे त्यामुळे वय दडवणे आदी बाबीला आळा बसला आहे आणि खुल्या पध्द्तीने स्पर्धा होत असल्याने कुस्तीगिर पुढे येत आहेत. नवीन तंत्रज्ञानानुसार मल्लांना राष्ट्रिय, आंतराष्ट्रीय स्तरावरील कुस्तीतील बदललेले नियम नवे डावपेच याची माहिती घर बसल्या मिळत आहे. शिवाय व्यायाम शाळेतील प्रशिक्षक यांनी देखील बदलते तंत्रज्ञान स्वीकारल्याने कुस्तीला चालना मिळाल्याचे दिसून येत आहे. आज उत्तर भारतातील मल्लांना आंतराष्ट्रीय स्तराप्रमाणे सोईसुविधा उपलब्ध होत आहेत. त्यामुळे उत्तर भारतीय मल्ल आंतराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करत आहेत. महाराष्ट्रात देखील शासनाने उत्तम पध्दतीच्या सुविधा उपलब्ध करुन दिल्यास महाराष्ट्रील मल्ल देखील आंतराष्ट्रीय स्तरावर जाण्यास मागे राहणार नाही. राष्ट्रिय स्तरावर झालेल्या वरिष्ठ राष्ट्रिय कुस्ती स्पर्धा, सबज्युनिअर राष्ट्रिय स्पर्धेत महाराष्ट्राच्या मल्लांनी फ्रीस्टाईल, ग्रीकोरोमन प्रकारात दिमाखदार कामगिरी करुन विजेतेपद प्राप्त केले आहे. यापुढे देखील शासनाने मल्लांना 5 टक्के आरक्षणातून नोकरीमधून संधी दिल्यास खेळामुळे करिअर करण्यासाठी अनेक मल्ल आत्मविश्वासाने कुस्तीकडे वळतील. कोरोना महामारीमुळे मल्लांचे आर्थिक नुकसान झाले असले तरी परिषदेने सातत्याने शासनाकडे स्पर्धा व्हाव्यात यासाठी पाठपुरावा केला होता. संसर्गाचे संकट गडद असल्यामुळे गेल्यावर्षी स्पर्धा झाली नव्हती मात्र यंदा कोरोना नियमांत शिथीलता आल्याने परिषदेने कुस्ती स्पर्धा व्हावी यासाठी अध्यक्षांच्या माध्यमातून शासनाला साकडे घातले होते. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, क्रिडामंत्री सुनिल केदार यांनी खेळाडूंचे हित डोळय़ापुढे ठेवत अतिशय सकारात्मक भूमिका घेतल्याने आज सातारला जिल्हा तालिम संघाच्यावतीने ही स्पर्धा पार पडत आहे याचा मनस्वी आनंद आहे.