ऑनलाईन टीम / नागपूर :
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते, विचारवंत पत्रकार मा. गो. वैद्य यांचे आज निधन झाले. वयाच्या 98 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मा. गो. वैद्य यांनी संघाच्या अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले होते.
मॉरिस कॉलेजमध्ये असताना 1943 सालापासूनच मा. गो. वैद्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय स्वयंसेवक होते. 1948 साली गांधी हत्येनंतर संघावर बंदी आली, त्यावेळी त्यांनी भूमिगत राहून काम केले.
त्यांच्या मागे पत्नी, तीन मुली, पाच मुले असा परिवार आहे. मा. गो. वैद्य यांची अंतयात्रा रविवार दि. 20 डिसेंबर रोजी सकाळी 9.30 वाजता त्यांच्या राहात्या घरातून (80, विद्याविहार, प्रतापनगर, नागपूर 22) निघणार आहे. अंबाझरी घाटावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील.