पुढील वर्षापासून बदल लागू करण्याचा हॉकी इंडियाचा निर्णय
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
राष्ट्रीय हॉकी चॅम्पियनशिप स्पर्धा पुढील वर्षापासून नव्या फॉरमॅटमध्ये घेतल्या जाणार असून हॉकी इंडियाने स्थानिक स्पर्धांसाठी नवी संरचना करण्याचा निर्णय घेतला. स्पर्धकांचा सहभाग वाढावा आणि राज्य, केंद्रशासित प्रदेश, विविध संस्था व अकादमी स्तरावर त्याचा विकास व्हावा, या उद्देशाने ही नवी रचना केली जाणार आहे.
हॉकी इंडियाच्या कार्यकारी मंडळाने अलीकडेच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे. हॉकी इंडियात नोंदणी झालेले सदस्य राज्य संघटना, पब्लिक सेक्टर घटक किंवा विभागीय घटक आणि अकादमी सदस्यांच्या महिला व पुरुष उपकनिष्ठ, कनिष्ठ व वरिष्ठ राष्ट्रीय चॅम्पियनशिप्स स्पर्धांची नवीन रचना करण्यात येणार आहे. सुधारित रचनेनुसार, एखाद्या खेळाडूला फक्त एकाच स्पर्धेत आपल्या संघाचे प्रतिनिधित्व करावे लागणार आहे. ‘वयोगटाच्या कोणत्याही एकाच स्पर्धेत त्याला भाग घेण्याची परवानगी असेल. देशातील या अव्वल स्पर्धांत भाग घेण्याची जास्तीत जास्त स्पर्धकांना संधी मिळावी, हा त्यामागचा उद्देश,’ असे हॉकी इंडियाने सांगितले.
राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होण्यासाठी प्रत्येक राज्य संघटनांनी विविध विभागाची राज्यस्तरीत पात्रता स्पर्धा घेणे सक्तीचे करण्यात आले आहे. विविध वयोगटातील अ व ब विभागीय स्पर्धा याआधी घेतल्या जात होत्या. पण यापुढे त्या घेतल्या जाणार नाहीत. त्याऐवजी विविध गटाच्या वार्षिक राष्ट्रीय चॅम्पियनशिप घेतल्या जातील. त्यात राज्यस्तरावरील महिला व पुरुष स्पर्धक उपकनिष्ठ, कनिष्ठ व वरिष्ठ वयोगटात सहभागी होऊ शकतील,’ असे हॉकी इंडियाचे अध्यक्ष मोहम्मद मुश्ताक अहमद यांनी सांगितले. स्पर्धेचे धोरण व मार्गदर्शक तत्त्वे यापुढेही कायम राहणार आहेत. प्रत्येक राष्ट्रीय चॅम्पियनशिप साखळी व बाद पद्धतीने खेळविल्या जातील आणि स्पर्धकांच्या संख्येनुसार त्यांची गटविभागणी करण्यात येणार आहे.