प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकाऱयांना पंतप्रधानांचा सल्ला
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
आयपीएस अधिकाऱयांनी कर्तव्यपूर्तीवेळी ‘राष्ट्र प्रथम, सदैव प्रथम’ (Nation First, Always First) ही भावना जागृत ठेवणे आवश्यक असल्याचा बहुमोल सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकाऱयांना दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवारी व्हर्च्युअल माध्यमातून हैदराबादमधील सरदार वल्लबभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीतील प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकाऱयांशी संवाद साधला.
येत्या 15 ऑगस्टला भारताच्या स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण होणार आहेत. या 75 वर्षाच्या कालावधीत देशाने पोलीस यंत्रणेला अधिकाधिक बळ देण्याचा प्रयत्न केला आहे. पोलिसांना चांगल्या पद्धतीचे प्रशिक्षण देण्यापासून त्यांच्या सेवा-सुविधा वाढविण्याचा प्रयत्न सरकारने वेळोवेळी केलेला आहे. देशातील प्रत्येक क्षेत्रामध्ये अमुलाग्र बदल होत असताना आपण नवे करियर सुरु करत आहात. आपल्या करियरमधील पुढील 25 भारताच्या विकासाच्या दृष्टीनेही अत्यंत महत्वाची आहेत. त्यामुळे आपली मानसिकता नेहमी सकारात्मक ठेवून कार्यरत राहण्याची सूचनाही पंतप्रधानांनी यावेळी केली.
कोरोनाकाळातील पोलिसांच्या कामाचे कौतुक
पोलीस दलाने मागील दीड वर्षापासून कोरोना काळात उत्तम काम केल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. ‘कोरोना काळात पोलिसांनी देशवासियांच्या खांद्याला खांदा लावून काम केले आहे. या काळात अनेक पोलिसांना आपला प्राण गमवावा लागला. त्यांना मी श्रद्धांजली वाहतो’ असे पंतप्रधान आपल्या भाषणात म्हणाले.
आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणांचे आव्हान
देशात आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणामध्ये वाढ होत असून ते रोखण्यासाठी सरकार वेगवेगळय़ा उपाययोजना करत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. आर्थिक गुह्यांनी आता गाव, जिल्हा आणि राज्यांच्या सीमा पार करून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आव्हान निर्माण केल्याचेही त्यांनी सांगितले.