प्रतिनिधी / सातारा :
सातारा जिल्ह्यातील रास्त भाव दुकानांना आता कार्पोरेट लूक येणार आहे. धान्य दुकानांचे आय.एस.ओ. मानांकन करण्यात येणार आहे. त्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. काही रास्त भाव दुकानदारांनी आपले रास्त भाव दुकान मानांकनासाठी तयार सुद्धा केले आहे. प्राथमिक स्वरुपात सातारा जिल्ह्यातील निसराळे येथील रास्त भाव दुकानास पुणे विभागीय उपायुक्त (पुरवठा) त्रिगुण कुलकर्णी यांनी स्वत: आय.एस.ओ. टिम सोबत नुकतीच पहाणी केली. त्यांच्या समवेत जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
निसराळे येथील रास्त भाव दुकानदार अशोकराव पिसाळ यांच्या दुकानास भेट देवून कुलकर्णी म्हणाले, हे दुकान गुणवत्तापूर्ण असून त्यांचा आदर्श इतर रास्त भाव दुकानदारांनी घ्यावा. आय.एस.ओ मानांकनामुळे रास्त भाव दुकानांचा पारंपारीक लूक बदलला जाणार असून रास्त भाव दुकानात स्वच्छता आणि पारदर्शी कामकाजाला प्राधान्य दिले जाणार आहे. रास्त भाव दुकानांसह सातारा जिह्यातील सर्व शासकीय धान्य गोदामे, तहसील कार्यालयातील पुरवठा विभाग, जिल्हा पुरवठा कार्यालय सुद्धा आय.एस.ओ. मानांकनाच्या दृष्टीने तयारी करीत आहे. याचेही उपायुक्त कुलकर्णी यांनी कौतुक केले.
आय.एस.ओ. मानांकामुळे रास्त भाव दुकानांसह शासकीय गोदामांचे चित्र अधिक आकर्षक होणार
आय.एस.ओ. मानांकामुळे रास्त भाव दुकानांसह शासकीय गोदामांचे चित्र अधिक उत्साही व आकर्षक असेल. आकर्षक रंगसंगतीने दुकाने रंगली जातील. दुकानदार यांच्या अंगावर निळ्या रंगाचा ?प्रन असेल. दुकानात तो वापरणे बंधनकारक राहणार आहे. प्रत्येक दुकानदार यांना ओळखपत्र दिले जाणार असून त्यावर कोडही असेल. हे ओळखपत्र दुकानात वापरणे बंधनकारक राहिल.
ग्राहकांना रास्त भाव दुकांनावर मिळणार विविध सुविधा
प्रत्येक दुकानात आग प्रतिबंधक युनिट असेल तसेच सी.सी. टिव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून त्याचा पुरवठा करण्यात आलेला आहे. याशिवाय वजन काटे प्रमाणित असल्याचे प्रमाणपत्र, रास्त भाव दुकानाचा परवाना, तक्रार नोंदवही, विविध प्रकारचे फलक, धान्याचे नमुने पारदर्शक भांडय़ात ठेवणे, ग्राहकांना पिण्याचे पाणी ठेवणे, त्यांची बैठक व्यवस्था करणे, ग्राहकांशी सौजन्याने वागणे, धान्य विहित वेळेत वाटप करणे, तक्रारी असेल तर ती कोठे करावयाची त्याचा पत्ता, संपर्क क्रमांक याची माहिती उपलब्ध असेल. याशिवाय रास्त भाव दुकानाची सुरु व बंद करण्याची वेळ नमूद असलेला फलक, रास्त भाव दुकानामध्ये उपलब्ध धान्याची आवक-जावक, सर्व प्रकारच्या नोंदवह्या याचबरोबर तहसीलदार यांच्याकडून प्रमाणित केलेली अद्यावत ग्राहक यादी या बाबींचा त्यामध्ये समावेश असेल.