सराव सामना – पहिल्या दिवशी भारताच्या 9 बाद 306 धावा, अवेश खान जखमी
वृत्तसंस्था/ डरहॅम
कौंटी सेलेक्ट इलेव्हनविरुद्ध सुरू झालेल्या तीन दिवसीय सराव सामन्यात भारतीय संघाने पहिल्या दिवशीअखेर केएल राहुलच्या शतकाच्या बळावर 90 षटकांत 9 बाद 306 धावा जमविल्या. राहुलने 150 चेंडूत 101 धावा जमविल्यानंतर निवृत्ती घेतली. त्याने जडेजासमवेत शतकी भागीदारी नोंदवली.
या सामन्यात भारताने विराट कोहली, अजिंक्य रहाणे यांच्यासह मोहम्मद शमी, इशांत शर्मा व आर. अश्विन यांना विश्रांती दिली तर वेगवान गोलंदाज अवेश खानच्या हाताच्या अंगठय़ाला दुखापत झाली आहे. तो या सामन्यात कौंटी सिलेक्ट संघाकडून खेळत होता. स्वतःच्याच गोलंदाजीवर विहारीचा जोरदार ड्राईव्ह अडविण्याच्या प्रयत्नात त्याच्या अंगठय़ाला दुखापत झाली. नुकतेच दिवंगत झालेले माजी क्रिकेटपटू यशपाल शर्मा यांना आदरांजली म्हणून भारतीय खेळाडूंनी डाव्या दंडावर काळय़ा फिती लावल्या होत्या. डरहॅमच्या यू टय़ुब चॅनेलवर या सामन्याचे स्ट्रीमिंग सुरू आहे.
भारताने प्रथम फलंदाजी स्वीकारल्यानंतर रोहित शर्मा 9 धावांवर बाद झाला. मयांक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी यांनी चांगली सुरुवात केली तरी त्यांना मोठय़ा खेळी करता आल्या नाहीत. 4 बाद 107 अशा स्थितीनंतर केएल राहुल व रवींद्र जडेजा यांनी पाचव्या गडय़ासाठी 127 धावांची भागीदारी करून संघाला सुस्थिती प्राप्त करून दिली. शतक पूर्ण झाल्यानंतर राहुलने निवृत्ती घेतली. त्याने 101 धावांच्या खेळीत 11 चौकार, 1 षटकार मारला. जडेजाने नंतर शार्दुल ठाकुरसमवेत 48 धावांची भर घातली. शार्दुल 20 धावांवर बाद झाला तर जडेजाने 75 धावांचे योगदान दिले. त्याने 146 चेंडूंच्या खेळीत 5 चौकार, 1 षटकार मारला. अक्षर पटेल 0, उमेश यादव 12 धावा काढून बाद झाले. कौंटी सिलेक्ट इलेव्हनच्या क्रेग माईल्सने 3, लीन्डॉन जेम्स व लियाम पॅटर्सन व्हाईट यांनी प्रत्येकी 2, जॅक कार्सनने एक बळी मिळविला.
संक्षिप्त धावफलक ः भारत प.डाव 90 षटकांत 9 बाद 306 ः अगरवाल 28, पुजारा 21, विहारी 24, राहुल 101 निवृत्त, जडेजा 75, शार्दुल ठाकुर 20, उमेश यादव 12, पटेल 0, बुमराह नाबाद 3, सिराज नाबाद 1, अवांतर 12. गोलंदाजी ः माईल्स 3-42, जेम्स 2-32, पॅटर्सन व्हाईट 2-79, कार्सन 1-71.