‘कर्जमाफी’च्या आरोपावर केंद्र सरकारचा टोला
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
केंद्र सरकार किंवा रिझर्व्ह बँकेने कोणत्याही कर्जबुडव्या व्यक्तीचे कर्ज माफ केलेले नसून केवळ काही लोकांचे कर्ज राईट ऑफ केले आहे. कर्ज राईट ऑफ करणे म्हणजे ते माफ केले असे होत नाही. कर्ज राईट ऑफ करणे आणि ते माफ करणे यातील अंतर राहुल गांधींनी समजून घ्यावे. त्यासाठी त्यांनी त्यांच्याच पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी अर्थमंत्री पी. चिंदबरम यांची शिकवणी लावावी असा उपरोधिक टोला केंद्र सरकारने लगावला आहे.
रिझर्व्ह बँकेने पेंद सरकारच्या आग्रहाला बळी पडून विजय मल्ल्या, नीवर मोदी यांसारख्या कर्जबुडव्यांची कर्जे पुनर्लिखित केल्याची माहिती रिझर्व्ह बँकेने दिली होती. एका कार्यकर्त्यांने माहिती अधिकारात विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना ही माहिती देण्यात आली होती. अशी एकंदर 68 हजार कोटी रूपयांची कर्जे राईट ऑफ करण्यात आल्याची ही माहिती होती.
या माहितीच्या आधारावर मंगळवारी काँगेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठविली होती. केंद्राकडे शेतकऱयांची कर्जे माफ करण्यासाठी पैसा नाही. मात्र देशाला हजारो कोटी रूपयांचा चुना लावलेल्या आणि आता देश सोडून पळून गेलेल्यांची कर्जे मात्र माफ करण्यात आली आहेत, अशी खोचक टीका त्यांनी केली होती.
केंद्राचे प्रत्युत्तर
या टीकेला केंद्र सरकारच्या वतीने अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी उत्तर दिले. राहुल गांधींना कर्ज राईट ऑफ करणे आणि ती माफ करणे यातील फरक समजत नाही. ते केवळ जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. काँगेस सत्तेवर असतानाही अशी लक्षावधी कोटी रूपयांची कर्जे राईट ऑफ करण्यात आली असून ती बँकांची थकबाकी हाताळण्याची सर्वसामान्य प्रक्रिया आहे. चिदंबरम यांना या प्रक्रियेची योग्य माहिती आहे. तेव्हा राहुल गांधी यांनी ही प्रक्रिया त्यांच्याकडून समजून घ्यावी, असे प्रतिपादन सीतारामन यांनी केले.
कर्जे ‘राईट ऑफ’ करणे म्हणजे काय ?
प्रदीर्घ काळ ज्या कर्जांची परतफेड झालेली नसते, व परतफेड होण्याची शक्यता नसते अशी कर्जे राईट ऑफ केली जातात. म्हणजेच त्यांची परतफेड तात्पुरती थांबविली जाते. मात्र याचा अर्थ कर्जदार कर्जमुक्त झाला असा होत नाही. कर्जदारावर जी कारवाई सुरू करण्यात आलेली असते ती सुरूच राहते. तसेच कर्जदाराला ही थकबाकी चुकती करावीच लागते. कर्ज राईट ऑफ करणे ही बँकिंग क्षेत्रातील तांत्रिक प्रकिया असून कर्जमाफीशी तिचा संबंध नाही.