ऑनलाईन टीम / मुंबई :
राज्याचे अधिवेशन सुरु असतानाच आयकर विभागाची राज्यात अनेक ठिकाणी छापेमारी सूरू आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनी छापेमारीवर प्रतिक्रीया दिली आहे. युवासेनेचा पदाधिकारी असलेला राहुल कनाल हा मुंबईच्या नाईट लाईफ गँगचा सदस्य आहे. तो संध्याकाळी कोणासोबत असतो, हे पाहणे गरजेचे आहे. दिशा सालियन मृत्यूप्रकरणात त्याचा काही संबंध आहे का, याचाही तपास झाला पाहिजे, असे नितेश राणे यांनी म्हटले आहे.
माध्यमांशी बोलताना नितेश राणे म्हणाले, राहुल कनाल हा आदित्य ठाकरे यांच्या नाईटलाईफ गँगचा भाग होता. दिशा सालियन मृत्यूप्रकरणात राहुल कनालचा संबंध असल्याचा संशय आहे. 8 जूनला दिशाचा मृत्यू झाला त्या रात्री आणि 13 तारखेला राहुल कनाल कुठे होता? त्यावेळचं राहुल कनालचं मोबाईल टॉवर लोकेशन तपासलं पाहिजे. यामधून काहीतरी लिंक नक्की सापडेल.
राहुल कनाल मुंबईत भाईजान नावाचं हर्बल हुक्कापार्लर चालवतो. तसेच त्याचे एक रेस्टॉरंटही आहे. राहुलचे वडील डेंटिस्ट होते. मग त्याच्याकडे एवढा पैसा कुठून आला? त्याच्याकडे कोणाचा पैसा आहे? राहुलला थेट शिर्डी संस्थानाचं विश्वस्तपद देण्यात आलं. राज्यपालनियुक्त आमदारांच्या यादीतही त्याचा समावेश असल्याचे समजते. त्याच्यावर कृपादृष्टी का करण्यात आली, असा प्रश्नही राणे यांनी उपस्थित केला.