ऑनलाईन टीम
काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी विधानसभा निवडणुकांनंतर पक्षांतर्गत निवडणुका घेण्याचं निश्चित झाले आहे. अशातच दिल्ली काँग्रेसने मंजूर केलेल्या एका ठरावाची चर्चा आहे. राहुल गांधी यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी तात्काळ निवड करावी, असा ठरावच दिल्ली काँग्रेसने पक्षाच्या बैठकीत मंजूर केला आहे.
देशातील सध्याच्या राजकीय स्थितीवर चर्चा करण्यासाठी दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष चौधरी अनिल कुमार यांनी रविवारी वरिष्ठ काँग्रेस नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत काँग्रेसला मजबूत करण्यासाठी भविष्यातील धोरणांवर चर्चा झाली. यावेळी तीन ठराव संमत करण्यात आले. यामध्ये देशातील सध्याची राजकीय स्थिती आणि मोदी सरकारचा गैर लोकशाही मार्गाने सुरू असणाऱ्या कारभारामुळे राहुल यांनी काँग्रेस अध्यक्षपद स्वीकारावे, असा ठराव करण्यात आला.
दरम्यान, देशातील विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर पक्षांतर्गत निवडणुका घेण्याला काँग्रेस कार्यकारिणीनं मंजुरी दिली आहे. कार्यकारिणीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत पक्षांतर्गत निवडणुका घेण्याचं निश्चित करण्यात आले होते. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यांत काँग्रेसच्या २३ वरिष्ठ नेत्यांनी पक्षांतर्गत निवडणुका घेण्याबाबत सोनिया गांधी यांना पत्र लिहिले होते. त्यानंतर सोनिया गांधी यांनी त्यातील काही नेत्यांची बैठक घेऊन उपस्थित केलेल्या प्रश्नांबाबत चर्चा केली होती.