जम्मू / वृत्तसंस्था
काँग्रेसचे नेते राहुल गांधी गुरुवारी दोन दिवसांच्या जम्मू दौऱयावर दाखल झाले. यादरम्यान त्यांनी श्री माता वैष्णोदेवीचे दर्शन घेतले. तत्पूर्वी सायंकाळच्या आरतीलाही उपस्थिती लावली. या दर्शनासाठी ते कटरा येथून पायी निघाले होते. राहुल गांधी यांनी दर्शनमार्गावर भक्तांशी संवाद साधला. यावेळी भाविकांनी राहुल गांधींसोबत सेल्फीही घेतले. गुरुवारी रात्री त्यांनी वैष्णोदेवी येथेच राहिल्यानंतर शुक्रवारी ते जम्मूमध्ये दाखल होणार आहेत. जम्मूमध्ये ते पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱयांना भेटतील. जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर राज्यात बदललेल्या परिस्थितीचाही आढावा ते घेणार असल्याचे पक्षपातळीवरून सांगण्यात आले. माता वैष्णोदेवी भेटीदरम्यान त्यांनी कोणत्याही राजकीय मुद्दय़ावर भाष्य करण्यास नकार दर्शवला. मी येथे माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी आल्याने कोणत्याही राजकीय मुद्यावर बोलणार नाही, असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. या दौऱयावेळी जम्मू विमानतळावर त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.