वेलसाव व पणजीत विविध कार्यक्रम
प्रतिनिधी /वास्को
काँग्रेसचे केंद्रीय नेते राहुल गांधी यांचे आज शनिवारी सकाळी गोव्यात आगमन होणार आहे. त्यानंतर संध्याकाळपर्यंत गोव्यात विविध ठिकाणी त्यांचे कार्यक्रम होणार आहेत. राहुल गांधी आज सकाळी पावणेदहाच्या सुमारास दाबोळी विमानतळावर दाखल होतील. विमानतळावर काँग्रेसच्या नेत्यांकडून त्यांचे स्वागत होईल. काँग्रेसचे नेते व कार्यकर्त्यांनी दिवसभरातील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जय्यत तयारी चालवली आहे.
प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संकल्प आमोणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल गांधी दाबोळी विमानतळावर उतरल्यानंतर थेट दक्षिण गोव्यातील मच्छीमारबांधवांचे प्रमुख केंद्र असलेल्या वेलसाव समुद्रकिनाऱयाकडे प्रयाण करतील. वेलसावच्या दांडो किनाऱयावर सकाळी सव्वा अकरा वाजता त्यांचा कार्यक्रम होणार आहे. या ठिकाणी ते स्थानिक पारंपरिक मच्छीमार समुहाकडे चर्चा करतील. मच्छीमार समुहाच्या अनेक समस्या असून काही प्रश्न गंभीर स्वरूपाचे आहेत. त्यामुळे त्यांच्या समस्याही राहुल गांधी जाणून घेतील. शिवाय याच भागात रेल्वे दुपदरीकरणाची समस्या गंभीर असून कोळसा वाहतुकीमुळे होणाऱया प्रदुषणालाही या भागातून विरोध होत आहे. त्यामुळे या प्रश्नावरसुद्धा राहुल गांधी स्थानिक मच्छीमार व नागरिकांचे म्हणणे जाणून घेणार आहेत, अशी माहिती संकल्प आमोणकर यांनी दिली. त्यानंतर राहुल गांधी पणजीतील आझाद मैदानाला भेट देतील व तेथील हुतात्मा स्मारकाला अभिवादन करतील. त्यानंतर ते खाणग्रस्तांनाही भेटणार आहेत. त्यांच्या समस्या व अडचणी जाणून घेणार आहेत.
बांबोळी येथील श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये राहुल गांधी पक्ष कार्यकर्त्यांना व नेत्यांना भेटणार आहेत. त्यांच्याशी चर्चा व मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर रात्री आठच्या सुमारास राहुल गांधी दाबोळी विमानतळावरून पुन्हा दिल्लीकडे प्रयाण करतील. राहुल गांधीचे स्वागत आणि त्यांचे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी काँग्रेसचे नेते व कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी चालवलेली आहे. सर्व सज्जता ठेवलेली आहे. विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, प्रदेश अध्यक्ष गिरीश चोडणकर तसेच गोव्याचे प्रभारी दिनेश गुंडुराव हेसुद्धा जातीने कार्यरत असल्याची माहिती संकल्प आमोणकर यांनी दिली.