एनसीए अध्यक्षपदाकरिता पुन्हा एकदा व्हीव्हीएस लक्ष्मणशी संपर्काची शक्यता, अनिल कुंबळेचा पर्यायही विचाराधीन
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
माजी दिग्गज फलंदाज, कर्णधार राहुल द्रविडने भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी आपला अर्ज दाखल केला असून त्याची निवड आता जवळपास निश्चित झाली आहे. द्रविड मुख्य प्रशिक्षकपदी रुजू झाल्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमी अध्यक्षपद रिक्त होईल. त्यासाठी व्हीव्हीएस लक्ष्मणला राजी केले जाईल, असे प्रथमदर्शनी संकेत आहेत.
द्रविडने अर्ज केल्यामुळे क्रिकेट सल्लागार समितीची जबाबदारी बरीच कमी झाल्याचे चित्र आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरभ गांगुली व सचिव जय शाह यांच्यासाठी राहुल द्रविड हा प्रथम पसंतीचा आणि एकमेव पर्याय ठरला आहे.
‘राहुल द्रविडने मुदतीच्या शेवटच्या दिवशी आपला औपचारिक अर्ज दाखल केला आहे. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत त्याच्या नेतृत्वाखाली कार्यरत गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हाम्ब्रे व क्षेत्ररक्षण प्रशिक्षक अभय शर्मा यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील जबाबदारीसाठी यापूर्वीच अर्ज दाखल केले आहेत. द्रविडने अर्ज दाखल करण्याची औपचारिकता बाकी होती. ती आता पूर्ण झाली आहे’, असे बीसीसीआयमधील एका वरिष्ठ सूत्राने मंगळवारी नमूद केले.
केकेआर-चेन्नई सुपरकिंग्स आयपीएल फायनल लढतीदरम्यान गांगुली व जय शाह यांनी द्रविडची भेट घेत त्याला मुख्य प्रशिक्षकपदासाठी राजी केले होते. त्यानंतर प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागवण्याची रितसर प्रक्रिया सुरु केली गेली. विद्यमान मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेतील भारताच्या मोहिमेनंतर निवृत्त होत असून त्या पार्श्वभूमीवर निवड प्रक्रियेला वेग आला आहे.
आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेनंतर भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध मायदेशी टी-20 मालिका खेळेल, त्यावेळी द्रविडच्या प्रशिक्षणाखाली भारतीय क्रिकेटमधील नव्या पर्वाला सुरुवात होईल. विद्यमान कर्णधार विराट कोहलीने टी-20 मधील नेतृत्वावरुन पायउतार होण्याची घोषणा केली असून द्रविडच्या प्रशिक्षणाखाली रोहित शर्मा नवा कर्णधार असेल, असे सध्याचे संकेत आहेत.
एनसीएसाठी व्हीव्हीएस लक्ष्मण चर्चेत
येत्या काही दिवसात राष्ट्रीय क्रिकेट अकादमी अध्यक्षपदासाठी सक्षम पर्याय उपलब्ध होऊ शकला नाही तर व्हीव्हीएस लक्ष्मणशी पुन्हा संपर्क केला जाईल, अशी चर्चा आहे. व्हीव्हीएस लक्ष्मणची राष्ट्रीय क्रिकेट अकादमी अध्यक्षपदी निवड झाल्यास तो आयपीएल प्रँचायझी सनरायजर्स हैदराबादतर्फे यापुढे कार्यरत राहू शकणार नाही. याशिवाय, स्तंभलेखन देखील करु शकणार नाही.
भारतीय क्रिकेटचे हित पाहता मुख्य राष्ट्रीय प्रशिक्षक व एनसीए अध्यक्ष यांच्यात समन्वय अधिक महत्त्वाचे असणे साहजिक आहे. द्रविड व लक्ष्मण दक्षिण विभागाकडून व भारतीय संघातूनही एकत्रित खेळले असल्याने ही जमेची बाजू असेल. मात्र, तूर्तास व्हीव्हीएस लक्ष्मण सदर पद स्वीकारण्यास राजी नाही, ही मंडळासमोरील मुख्य अडचण आहे.
कुंबळेशी संपर्क साधणार का?
बीसीसीआय याबाबत आणखी एकदा त्याच्याशी संपर्क साधण्याची शक्यता आहे. मात्र, यानंतरही तो राजी न झाल्यास अनिल कुंबळेचा आणखी एक तगडा पर्याय असेल. फक्त बीसीसीआय कुंबळेशी याबाबत संपर्क साधणार का, हे पहावे लागेल. द्रविड बेंगळूरमध्येच स्थित असल्याने राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे अध्यक्षपद हाताळणे त्याच्यासाठी फारसे कठीण नव्हते. पण, लक्ष्मणची निवड झाल्यास त्याला वर्षाकाठी किमान 200 दिवस हैदराबादमधून बेंगळूरमध्ये वास्तव्य हलवावे लागेल, हे स्पष्ट आहे.