नवी दिल्ली
भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी राहुल द्रविड यांची एकमताने निवड झाली. सुलक्षणा नाईक व आरपी सिंग यांचा समावेश असलेल्या क्रिकेट सल्लागार समितीने द्रविडची बीसीसीआयकडे याबाबत शिफारस केली आणि त्यानंतर निवडीची अधिकृत घोषणा केली गेली. भारतीय क्रिकेट संघ न्यूझीलंडविरुद्ध मायदेशी टी-20 व कसोटी मालिका खेळणार असून मुख्य प्रशिक्षक या नात्याने द्रविडच्या कारकिर्दीला येथे सुरुवात होईल.
विद्यमान प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या प्रशिक्षकपदाची मुदत आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारताच्या मोहिमेने संपत आहे. त्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने अर्ज मागवले होते. शास्त्री यांच्या प्रशिक्षणाखाली भारतीय संघ कसोटी क्रिकेटमध्ये अव्वलस्थानी विराजमान झाला.
शिवाय, संघाने आयसीसी कसोटी चॅम्पियनशिपमध्ये अंतिम फेरीपर्यंत धडक मारली. भारताने या कालावधीत 2018-19 मध्ये ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकणारा पहिला आशियाई संघ बनण्याचा मान प्राप्त केला.