बीसीसीआयच्या विनंतीनंतर प्रशिक्षकपद स्वीकारण्यास संमती, सौरभ गांगुली-जय शाह यांना द्रविडचे मन वळवण्यात यश
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारताचा महान फलंदाज राहुल द्रविडने युएईमधील टी-20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेनंतर भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपद स्वीकारण्यास अखेर होकार कळवला आहे. द्रविड प्रशिक्षकपदी रुजू होताना गोलंदाजी प्रशिक्षकपदी त्याच्या विश्वासातील पारस म्हांब्रेला पसंती मिळेल, असे संकेत आहेत. फलंदाजी प्रशिक्षकपदी विक्रम राठोड कायम राहण्याची शक्यता चर्चेत आहे. अर्थात, या निवडी निश्चित असल्या तरी बीसीसीआय सर्व पदासाठी रितसर अर्ज मागवणार आहे. दि. 17 नोव्हेंबर रोजी भारत-न्यूझीलंड यांच्यातील मालिकेला प्रारंभ होत असून त्यापूर्वी प्रशिक्षक निवडीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केलेल्या काही मोजक्या खेळाडूंपैकी द्रविड प्रारंभी प्रशिक्षकपदासाठी राजी नव्हता. पण, बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली व सचिव जय शाह यांनी आयपीएल फायनलदरम्यान त्याचे मन वळवले आणि त्यानेही होकार दर्शवला.
राहुल द्रविड मागील 6 वर्षांपासून भारत अ व 19 वर्षाखालील वयोगटात मार्गदर्शन देत आला असून रिषभ पंत, अवेश खान, पृथ्वी शॉ, हनुमा विहारी व शुभमन गिल आदी खेळाडू त्याच्या पठडीत तयार झाले आहेत. सध्या द्रविड बेंगळुरातील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या अध्यक्षपदी कार्यरत आहे.
‘द्रविडने 2023 विश्वचषक स्पर्धेपर्यंत प्रशिक्षकपद सांभाळण्याकरिता होकार दर्शवला आहे. प्रारंभी, तो यासाठी तयार नव्हता. पण, गांगुली व शाह यांनी आयपीएल फायनलच्या साईडलाईनवर त्याच्याशी बैठक घेतली आणि त्याचे मन वळवले’, असे बीसीसीआयमधील एका सूत्राने गोपनियतेच्या अटीवर नमूद केले. द्रविड पूर्ण वेळ मुख्य प्रशिक्षक असेल. ही अंतरिम जबाबदारी अजिबात नसेल, असेही या सूत्राने स्पष्ट केले. रवी शास्त्रींनी प्रशिक्षकपदी मिळवलेले यश पाहता, बीसीसीआयचा भारतीय प्रशिक्षक निवडण्यावरच सर्वस्वी भर असणार, हे यापूर्वीच स्पष्ट झाले होते.
विराट कोहली अद्याप कसोटी व वनडे कर्णधार असल्याने सध्याच्या स्थितीत आपण प्रशिक्षकपद स्वीकारु शकत नाही, असे एका माजी भारतीय कर्णधाराने स्पष्टपणे कळवले होते. या वर्षाच्या प्रारंभी ऑस्ट्रेलिया दौऱयापर्यंत कोहलीच्या मनमानीमुळे प्रशिक्षकपदासाठी काही दिग्गज राजीही नव्हते. पण, कोहली पालकत्वाच्या रजेवर असताना भारताने त्याच्या गैरहजेरीत झंझावाती यशाची मालिका कायम राखली आणि यानंतर काही समीकरणे बदलली आहेत.
रवी शास्त्रीपेक्षा अधिक मानधन
विद्यमान प्रशिक्षक रवी शास्त्री यांना 8.5 कोटी रुपये मानधन दिले जात होते आणि आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, द्रविडला त्यापेक्षाही अधिक मानधनाची ऑफर दिली गेली आहे. द्रविड-पारस म्हांब्रे कॉम्बिनेशन कायम राखण्यावर देखील एकमत झाले आहे. संघातील बरेच खेळाडू आपल्या कारकिर्दीच्या उत्तरार्धात आहेत. त्यामुळे, नवोदितांकडे ही धुरा सोपवताना द्रविड-म्हांबे कॉम्बिनेशनचा लाभ होईल, असा मंडळाचा होरा आहे.
‘रोहित पुढील वर्षी 35 व्या वर्षात पदार्पण करेल. विराट काही दिवसातच 33 वा वाढदिवस साजरा करणार आहे. शमी, इशांत शर्मा, पुजारा, अजिंक्य रहाणे अर्थातच अव्वल खेळाडू आहेत. पण, पुढील 2 वर्षात केव्हा तरी नवोदित खेळाडू या सर्वांची जागा घेत राहू शकतात आणि या परिस्थितीत यू-19 सेटअपमधील खेळाडूंना अधिक संधी मिळेल. द्रविड यू-19 संघाचा प्रशिक्षक राहिला असल्याने त्या अनुभवाचा येथे लाभ होईल’, असे सूत्राने म्हटले आहे.
विराट म्हणतो, काय घडते आहे, याची कल्पना नाही!
माजी दिग्गज फलंदाज राहुल द्रविडची प्रशिक्षकपदी नियुक्ती होणार, हे जवळपास निश्चित होत असताना याबाबत भारतीय कर्णधार विराट कोहलीने मात्र काय होते आहे, याची कल्पना नाही, असे उत्तर देत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. माझी याबाबत कोणाशीही सविस्तर चर्चा झालेली नाही, असे विराट याप्रसंगी म्हणाला. युएई-ओमानमधील टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर कर्णधारांच्या मीडिया सेशनमध्ये तो बोलत होता.