तालुका म. ए. समितीचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन : 28 नोव्हेंबर रोजी भव्य मोर्चा
प्रतिनिधी /बेळगाव
रिंगरोडच्या माध्यमातून येथील शेतकऱयांना भूमीहीन बनविण्याचा घाट घालण्यात आला आहे. त्याला आम्ही कोणत्याही परिस्थितीत थारा देणार नाही. आम्ही सोमवार दि. 28 रोजी भव्य मोर्चा काढणार असल्याची सूचना देण्यास आलो आहे. त्यादिवशी संपूर्ण कुटुंबासह जनावरे आणि चाबुक घेऊनच आम्ही हा मोर्चा काढणार आहे. याचा प्रशासनाने गांभीर्याने विचार करावा आणि आम्हाला सहकार्य करावे, असे आवाहन बेळगाव तालुका म. ए. समितीच्यावतीने जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे करण्यात आले आहे.
रिंगरोड करण्यामागचा उद्देश काय? रिंगरोडमुळे अत्यंत सुपिक जमीन नाहीशी होणार आहे. सध्या शेतकऱयांकडे 20 गुंठे-25 गुंठे अशी जमीन आहे. ती जमीन गेली तर त्यांनी जगायचे कसे? याचा राजकीय व्यक्तींनी किंवा प्रशासनाने वेळीच विचार करावा. येथील मराठी भाषिकांना उद्ध्वस्त करण्याचा जो डाव आखला आहे त्याविरोधात मराठी भाषिकांसह इतर भाषिकदेखील भाषाभेद, जातीभेद विसरून हा मोर्चा काढणार आहेत. तेव्हा प्रशासनाने त्याचा वेळीच विचार करावा आणि रिंगरोड प्रस्ताव बंद करावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
मोठय़ा संख्येने सहभागी व्हा
अगसगा, आंबेवाडी, बाची, बहाद्दरवाडी, बेळगुंदी, बिजगर्णी, गोजगा, होनगा, कडोली, काकती, कलखांब, कल्लेहोळ, कमकारट्टी, कणबर्गी, कोंडसकोप्प, मण्णूर, मास्तमर्डी, मुचंडी, मुतगा, नावगे, संतिबस्तवाड, शगमनहट्टी, शिंदोळी, सोनट्टी, येळ्ळूर-सुळगा, तमनायकनहट्टी (धामणे), तुरमुरी, उचगाव, वाघवडे, यरमाळ, येळ्ळूर, झाडशहापूर या गावांतील सुपिक जमिनी या रस्त्यामध्ये जात आहेत. जर या जमिनी गेल्या तर इतर शेतकऱयांनाही त्याचा फटका बसणार आहे. कारण येथील जमिनी हिसकावण्यासाठी बुडादेखील प्रयत्न करत आहे. तेव्हा संघटितपणे हा लढा लढायचा असून आता 28 रोजीच्या मोर्चामध्ये मोठय़ा संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहनही यावेळी तालुका म. ए. समितीतर्फे करण्यात आले आहे.
यावेळी माजी महापौर शिवाजी सुंठकर, माजी आमदार मनोहर किणेकर, माजी जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील, प्रकाश मरगाळे, ऍड. एम. जी. पाटील, ऍड. प्रसाद सडेकर, ऍड. श्याम पाटील, ऍड. सुधीर चव्हाण, ऍड. अमर येळ्ळूरकर, माजी महापौर किरण सायनाक, मनोज पावशे, तालुका पंचायतीचे माजी सदस्य सुनील अष्टेकर, एस. एल. चौगुले, आर. आय. पाटील, आर. एम. चौगुले, ऍड. रतन मासेकर, शिवाजी कुटे यांच्यासह समितीचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.